राष्ट्र अखंडित राखण्यासाठी संविधानाची गरज- राहुल नावंदर



 राष्ट्र अखंडित राखण्यासाठी  संविधानाची गरज- राहुल नावंदर


लातूर /प्रतिनिधी:राष्ट्राची अखंडता कायम राखण्यासाठी संविधानाची गरज आहे,असे मत राहूल नावंदर यांनी व्यक्त केले.
     भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई,भारत भारती, विद्याभारती,शिक्षण विवेक, विज्ञान भारती,क्रीडा भारती,  ERAएज्युकेशन रिसर्च असेम्ब्ली, पुणे,विद्याभारती,अखिल भारतीय शिक्षण संस्था दिल्ली,भारतीय शिक्षण प्रसारक संस्था संचलित श्री केशवराज शैक्षणिक संकुल, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्र चेतना शिबिराच्या सहाव्या दिवशी युवा चेतना तिसऱ्या सत्रात राहुल नावंदर यांनी 'संविधानाला अपेक्षित समान नागरी कायदा' या विषयावर विवेचन केले . 
    विद्यार्थ्यांना कर्तव्याची जाणीव करून दिली पाहिजे.समानता प्रस्थापित करण्यासाठी, संविधानाचे अस्तित्व कायम राखण्यासाठी व राष्ट्राची अखंडता  राखण्यासाठी संविधानाची आवश्यकता आहे.राष्ट्रीय एकता कायम राखणे त्याबरोबरच सामाजिक बांधिलकी कायम राखण्यासाठी समान नागरी कायदा आवश्यक असतो.मानवी जीवनाचे मूल्य संविधानाने जपले जाते.न्या.एन.सी.छागला यांनी समान नागरिकत्वाचा अंतर्भाव मार्गदर्शक तत्त्वांमध्ये केला.भारत हा देश धर्मनिरपेक्ष देश आहे. मूलभूत असलेल्या दहा गाभा घटकांपैकी स्त्री-पुरुष समानता हा सर्वात महत्त्वाचा गाभा घटक मानला जातो.संविधानाचे रक्षण करण्यासाठी जागरूक राहणे अत्यंत आवश्यक आहे. स्व-विकास करण्यासाठी राष्ट्राचा विकास करू शकतो.स्वतंत्र बुद्धीने कायदेशीररित्या राष्ट्राला पुढे नेण्यासाठी उद्युक्त होऊन कार्य करेल त्याच्यासाठी असणारे कवच म्हणजे संविधान होय,असे ते म्हणाले.
     कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिबीर संयोजक नितीन शेटे उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक,प्रमुख पाहुण्यांचा परिचय व स्वागत विनोद जाधव तर सूत्रसंचलन व आभार श्रीमती दिपाली आकनगिरे यांनी मानले. 
या प्रसंगी शिबीर संयोजक नितीनभाऊ शेटे,राहुल गायकवाड,युवा चेतना प्रमुख व राष्ट्र चेतना समन्वयक  शिबीर कार्यशाळा प्रमुख नागेश जाधव, महाव्यवस्थापक जितेंद्र जोशी, शिबीर प्रमुख गुरुनाथ झुंजारे आदी मान्यवर,शिक्षक व अन्य महाविद्यालयातील युवक  उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post