लातूर जिल्ह्यातील रेणापूर या तालुक्याच्या ठिकाणाहून त्यांनी आठवडी बाजार केला. अन् रात्रीच एकाच मोटार सायकलवरून जीव मुठीत धरून सहा जणांनी रांजणीची वाट धरली. हे कुटुंब लातूरपासून वीसएक किलोमीटर अंतरापर्यंत पुढे आलं होतं. यावेळी काटगावजवळ समोरून शिमला मिरची घेऊन येणाऱ्या पिकअपची आणि त्यांच्या मोटारसायकलची जोरदार धडक झाली. यात मोटारसायकलवरील दोन सख्खे भाऊ विकास प्रकाश आडे (वय ३३), आकाश प्रकाश आडे (वय ३०), विकास आडे यांची मुलगी वैशाली विकास आडे (वय ५), आकाश आडे यांचा मुलगा शंकर आकाश आडे (वय ३) हे चौघेजण जागीच ठार झाले. अपघात विकास प्रकाश आडे या दोन भावांची आई निर्मला प्रकाश आडे आणि त्यांची नात अर्थात विकास आडे यांची मुलगी रोहिणी विकास आडे (वय ६) या दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत. शुक्रवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.
अपघाताची माहिती मिळताच गातेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किशोर कांबळे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. जखमींना लातूर येथील स्व. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असून दोघींचीही प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. शवविच्छेदन करून चौघांचे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी हाके तांडा इथं रवाना करण्यात आले.
विकास आडे यांच्या पश्चात पत्नी आणि जखमी मुलगी रोहिणी, आई असा परिवार आहे. तर आकाश आडे यांच्या पश्चात फक्त आई आहे. आकाश आडे यांच्या पत्नीचा वर्षभरापूर्वी प्रसूतीवेळी मृत्यू झाला होता. तर वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आता या कुटुंबामध्ये निर्मला प्रकाश आडे आणि त्यांची नात रोहिणी विकास आडे, असा परिवार आहे. या घटनेने हाके तांड्यावर शोककळा पसरली आहे. एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी गातेगाव पोलिसांनी पिकअपसह चालकाला ताब्यात घेतले आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
No comments:
Post a Comment