फडणवीसांनी शब्दांचे इमले बांधले, जनतेला स्वप्नात फिरवून आणलं

 


 फडणवीसांनी शब्दांचे इमले बांधले, जनतेला स्वप्नात फिरवून आणलं


मुंबई : राज्य कर्जाच्या खाईत असताना अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वास्तवाचं भान नसलेला अर्थसंकल्प मांडला. अख्ख्या अर्थसंकल्पात शब्दांचे इमले बांधले आणि जनतेला स्वप्नात फिरवून आणलं. खरं तर सर्वोच्च न्यायालयाचा १४ मार्चचा निकाल विरोधात जातोय की काय, अशी शंका आल्यानेच निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन आजच्या अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पाडला गेला, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी फडणवीसांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाची अक्षरश: चिरफाड केली.

शिंदे फडणवीस सरकारचा पहिलावहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केला. केंद्र सरकारने अमृतकाल बजेट सादर केल्यानंतर अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प 'पंचामृत' ध्येयावर आधारित असल्याचं सांगत फडणवीसांनी लोकप्रिय घोषणांचा पाऊस पाडला. शेतकऱ्यांना वर्षाला १२ हजार देण्याची घोषणा, महिलांना ५० टक्के एसटी दरात सूट, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करतानाच महापुरुषांच्या स्मारकांना भरघोस निधीची घोषणाही फडणवीसांनी केली. विविध घटक डोळ्यासमोर ठेऊन फडणवीसांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचा फुगाच अजितदादांनी फोडला.

'ह्यांच्या' विकासाचं पंचामृत कुणालाच दिसणार नाही...!

महाविकास आघाडीने विकासाची पंचसूत्री मांडली, यांनी पंचामृत मांडलं पण 'अमृत' कुणीच बघितलं नाही, विकासाचं पंचामृत कुणालाच दिसणार नाही, अशी टोलेबाजी करतानाच बोलणाऱ्याच्या वाणीला आणि ऐकणाऱ्याच्या कानाला बरं वाटावं असाच आजचा अर्थसंकल्प असल्याची टीका अजित पवार यांनी केली.

भरीव निधी म्हणजे किती, कुणी सांगेल काय?

शिवरायांच्या नावाने सभागृहात घोषणा दिल्या पण स्मारकाचं काय, हे सांगितलं नाही. छत्रपती शिवरायांचं स्मारक कधी पूर्ण होणार? हा प्रश्न अनुत्तरित ठेवला. तसेच राज्य अर्थसंकल्पात भरीव तरतुदी करण्याची हमी, पण भरीव म्हणजे किती याची कोणतीही स्पष्टता नाही, असंही अजित पवार म्हणाले.

कसब्याचा 'झटका' आणि सुप्रीम कोर्टाच्या निकालाची भीती, त्यामुळे घोषणांचा पाऊस

नुकत्याच लागलेल्या कसब्याच्या निकालाची धास्ती आणि येत्या १४ मार्चला सुप्रीम कोर्टाला निकाल आपल्याविरोधात जाईल, याची सत्ताधाऱ्यांना भीती वाटते आहे. त्याअगोदर लोकप्रिय घोषणा करुन जनतेची मनं जिंकून घेण्याचा प्रयत्न आजच्या अर्थसंकल्पातून केला. पण फडणवीस यांनी 'अर्थसंकल्प सोप्या शब्दात' हे पुस्तक लिहून अर्थसंकल्प कसा समजून घ्यावा हे सांगण्याचा प्रयत्न केला. पण अर्थसंकल्प कसा सादर करावा हे जर वाचलं असतं तर बरं झालं असतं, अशी टोलेबाजी अजित पवार यांनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post