आमदारांनी राखले आपापले गड; लातूर बाजार समिती देशमुखांकडेच, जाणून घ्या इतर तालुक्यांची स्थिती...

 





आमदारांनी राखले आपापले गड; लातूर बाजार समिती देशमुखांकडेच, जाणून घ्या इतर तालुक्यांची स्थिती...

लातूर : लातूर जिल्ह्यातील ११ बाजार समित्यांच्या निवडणुका २८ आणि ३० एप्रिल रोजी झाल्या. या निवडणुकीत आमदारांनी आपापला गड राखण्यात यश मिळवले. लातूरचा गड देशमुखांनी कायम राखला. आमदार अभिमन्यू पवार, संभाजी पाटील निलंगेकरांनी आपापल्या बाजार समित्या जिंकून वर्चस्व कायम ठेवले.

  • सरासरी विजयाचे गणित गृहित धरल्यास भाजप पाच, महाविकास आघाडी तीन आणि काँग्रेस दोन असे संख्याबळ होते.
    लातूर आणि रेणापूर या दोन बाजार समितींमध्ये आमदार अमित देशमुख, आमदार धीरज देशमुख यांनी नवखे उमेदवार देऊनही त्यांनी सत्ता फक्त ताब्यातच ठेवली नाही, तर १८ च्या १८ जागा मिळवून काँग्रेस म्हणून एक वेगळा विजय नोंदवला आहे.

उदगीर, जळकोट या ठिकाणी काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसला बरोबर घेऊन निवडणूक लढवली. उदगीरमध्ये काँग्रेसने १८ पैकी १७ जागा जिंकून बहुमत मिळवले. त्या ठिकाणी भाजपला फक्त एक जागा जिंकता आली.
जळकोटमध्ये आघाडीने १५ जागा जिंकल्या. तीन जागांवर भाजपला विजय मिळाला. चाकूर बाजार समिती भाजपने स्वतःच्या ताब्यात ठेवण्यात यश मिळवले आणि १८ पैकी दहा जागा जिंकल्या.

निलंगा बाजार समितीत भाजपमध्ये अंतर्गत दुफळी चांगली चव्हाट्यावर आली होती. आमदार अभिमन्यू पवार आणि आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्यातील वाद जगजाहीर झाला आणि निवडणुकीच्या दिवशी दोघांनी एकत्र नारळ पाणी पिऊन निवडणुका संपल्या वाद संपल्याचे दाखवले होते.

निलंगा तालुक्यातील निलंगा, देवणी आणि औराद शहाजनी या तीन बाजार समितीमध्ये १८ पैकी १८ जागा जिंकून अरविंद पाटील यांनी विरोधकांना चितपट केले. या तीनही ठिकाणी महाराष्ट्र विकास आघाडी म्हणून राष्ट्रवादी शिवसेना, काँग्रेस एकत्रपणे लढले होते.
औसा बाजार समिती एका अर्थाने शिवसेनेच्या ताब्यात होती. तिथे मविआ एकत्रित लढली; परंतु आमदार अभिमन्यू पवार यांनी १८ पैकी १६ जागा जिंकल्या आणि दोन जागी अपक्ष जिंकले. आमदार पवार यांनी एक हाती विजय मिळवला. अहमदपूरमध्ये १८ पैकी १४ जागा महाविकास आघाडीला मिळाल्या आणि चार जागा भाजपला मिळाल्या

Post a Comment

Previous Post Next Post