उपक्रमशील मुख्याध्यापक...
उपक्रमशील मुख्याध्यापक...
मा.श्री कालिदास हरिदास शेळके सर..(सरस्वती विद्यालय, खाडगाव, प्रकाश नगर, लातूर)
श्री कालिदास हरिदास शेळके सर यांचे मूळ गाव बोर्डा ता.कळंब जि.धाराशिव. येथील रहिवासी असून त्यांचे शिक्षण बी एस सी, बी.पीएड आहे. त्यांचे वडील ही शिक्षक असल्यामुळे सरांनी शिक्षण क्षेत्रामध्ये कार्य करण्याचे ठरविले.
सरांचे वडील व श्री रामकिशनजी राठी सर हे एकाच शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. तेव्हा सरस्वती विद्यालयामध्ये विज्ञान विषयाची जागा रिक्त असल्यामुळे राठी सरांनी श्री शेळके सरांना आपल्या बालविकास शिक्षण प्रसारक मंडळ लातूर द्वारा संचलित सरस्वती विद्यालय खाडगाव प्रकाश नगर लातूर या शाळेमध्ये दि.12/06/1989 मध्ये प्रथम नियुक्ती दिली व रुजू करून घेतले आणि आज वार शनिवार दिनांक 31/08/ 2023 रोजी 34 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सर सेवानिवृत्त होत आहेत..
एक उपक्रमशील मुख्याध्यापक म्हणून इतर शाळा आज त्यांच्याकडे पाहतात. अनेक नव्या संकल्पना शाळेत राबवून शाळा त्यांनी सदैव चर्चेत ठेवली. प्रकाश नगरचा भाग हा आर्थिक ,सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास भाग आहे. मुलांना घरी शैक्षणिक सोयी सुविधांचा अभाव आहे, याची जाणीव त्यांना होती. म्हणून दहावीच्या मुलांची तयारी करून घेण्यासाठी त्यांनी ज्यादा तासिका शाळेत सुरू करण्याचा निर्णय घेतला.
1995 मध्ये सरस्वती विद्यालयाचे विद्यार्थी गुणवत्ता यादी मध्ये आले. आणि त्यानंतर सातत्याने गुणवत्ता टिकून ठेवण्याचे काम विद्यालयाने केले.
इयत्ता दहावी च्या वार्षिक परीक्षेचा विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला पाहिजे. विद्यार्थ्यांनी सुद्धा शंभर पैकी शंभर टक्के घेतली पाहिजे यासाठी सरांनी ज्यादा तासाचे नियोजन केले. आणि 20 विद्यार्थ्यांनी शंभर पैकी शंभर टक्के घेतले. व विद्यालयाचा निकाल सुद्धा 99 टक्के लागला अशा पद्धतीने सरांनी सातत्याने गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले.
लातूर पॅटर्न मध्ये सरस्वती विद्यालयाने गुणवत्तेच्या बाबतीत उत्तुंग झेप घेतलेली आहे आणि आज पर्यंत गुणवत्ता टिकवून ठेवण्याचे काम लातूर जिल्ह्यामध्ये सरस्वती विद्यालयाने केलेले आहे.
इ. स 1997 साली लातूर जिल्ह्यात पहिली कॉम्प्युटर लॅब सरांनी सरस्वती विद्यालयामध्ये तयार केली. हजारो विद्यार्थ्यांनी या ठिकाणी कॉम्प्युटरचं ज्ञान घेतले या पाठीमागचा उद्देश एकच होता. की, आपल्या विद्यालयातील विद्यार्थ्यांना कॉम्प्युटरचे ज्ञान आले पाहिजे आणि आपले विद्यार्थी स्पर्धेमध्ये उतरले पाहिजे.
आपल्या विद्यालयाचे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये उतरले पाहिजे आणि ती टिकले सुद्धा पाहिजे यासाठी सरांनी विद्यालयामध्ये स्पर्धा परीक्षा विभाग सुरू करून NMMS (राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना) , स्कॉलरशिप परीक्षा, नवोदय प्रवेश परीक्षा, इंटरनॅशनल ऑलंपियाड परीक्षा,NTSE( राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा), भारतीय डाक विभाग दीनदयाळ शिष्यवृत्ती परीक्षा, गणित अध्यापक मंडळ परीक्षा, हिंदी राष्ट्रभाषा परीक्षा, इत्यादी परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून देण्याचे काम आणि त्यांच्यामध्ये स्पर्धात्मक वृत्ती निर्माण करण्याचं काम सरांनी सातत्याने केले आहे.
विद्यालयामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे सरांनी आयोजन केले. वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये एक हजार विद्यार्थ्यांना सहभागी करून घेऊन त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे काम केले.
सन 1997 साली सरस्वती विद्यालयामध्ये खो-खो चा संघ सरांनी तयार केला व राष्ट्रीय पातळीवर स्पर्धेसाठी सरांनी घेऊन गेले आणि या स्पर्धेमध्ये विद्यालयाचा संघ स्वर्ण पदक विजेता ठरला.
लातूर जिल्ह्यामध्ये पहिली आयसीटी लॅब सरस्वती विद्यालयामध्ये सरांनी स्थापित केले.
लातूर जिल्ह्यात सर्वप्रथम शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी सरांनी विद्यालयांमध्ये सन 2009 मध्ये डिजिटल क्लासरूम तयार करून त्याच शिक्षकांच्या अध्यापनासाठी वापर केला.
सरांचा अनेक क्षेत्रात क्रियाशील राहण्याचा उत्साह, नवनवीन गोष्टी शिकण्याची जिद्द, अभ्यास पूर्ण वाणी, सर्वांना सोबत घेऊन जाण्याचे कसब, प्रत्येक वेळी निर्माण होणाऱ्या अडचणीतून कौशल्याने मार्ग काढण्याची शैली, सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळण्याचा मनाचा मोकळेपणा, प्रत्येकाच्या मनात विश्वास निर्माण करण्याचे कौशल्य, माणसं जोडण्याची कला, अधिकाऱ्यांच्या, सहकाऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे धाडस आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनेक पदे उपभोगताना सर्वसामान्य माणसासोबत जुळलेली नाळ टिकवून ठेवलेली आहे.या गुणांमुळे शेळके सर एक आदर्श व्यक्तिमत्व आहेत..
शिक्षण क्षेत्रातील एक अभ्यासू अनुभवी असाधारण व्यक्तिमत्व म्हणून सरांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.
सरांच्या स्वभावाचे अनेक पैलू आहेत त्यांनी कधीही एकतर्फी विचार केला नाही दोन्ही बाजू ऐकून सुवर्णमध्य साधण्याचा त्यांचा स्वभाव आहे
एक शिक्षक म्हणून सुरू झालेला सरांचा प्रवास हा मुख्याध्यापक पदापर्यंत पोहोचला. गोरगरीब, दीनदलित, सर्व जातीधर्मातील विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत स्वतःला झोकून दिले. एक दिलखुलास सदाबहार अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून शेळके सरांनी आपला आगळावेगळा ठसा सरस्वती विद्यालयामध्ये उमटवला आहे.
आपुलकीची भावना, सहकार्याची वृत्ती, आपल्या कर्मचाऱ्यांशी, आपल्या सहकाऱ्यांशी सामंजस्यपणे वागतात. त्यांच्या इच्छा आकांक्षा समजून घेतात. यावरून शेळके सरांचे सर्वांवर असलेले प्रेम दिसून येते. शेळके सर हे सर्वांचे एक आदर्श, एक मार्गदर्शक व एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत. हीच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ताकद आहे.
सरस्वती विद्यालयामध्ये सरांनी गेल्या 35 वर्षामध्ये शिक्षक, पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक,मुख्याध्यापक, अशा विविध पदावर काम करत असताना सर्व क्षेत्रांमध्ये उत्तुंग झेप घेण्याचं काम आज विद्यालयाने केलेला आहे यामध्ये सरांचा सिंहाचा वाटा आहे. या सर्व कार्यकाळामध्ये त्यांनी आपली जबाबदारी अतिशय कर्तव्यदक्षपणे पार पाडली इत्यादी गुणांमुळे सरांचे नाव शैक्षणिक क्षेत्रामध्ये अभिमानाने व कौतुकाने घेतली जाते.
महाराष्ट्रातील अनुदानित शाळेमध्ये विनाअनुदानित तत्त्वावर नैसर्गिक वाढीच्या वर्ग/ तुकड्या देण्यात आल्या. त्या शाळेंना प्रचलित नियमानुसार अनुदान देणे बंधनकारक होते पण सरकारने त्याला अनुदान दिले नाही. तेव्हा श्री शेळके सर, श्री साळुंके सर, श्री भागवत सर,स्वर्गीय राठी सर, स्वर्गीय गायकवाड सर, स्वर्गीय माने सर, व बाल विकास शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी यांनी आम्हाला योग्य मार्गदर्शन करून तुम्हाला आंदोलनाच्या माध्यमातून हक्काचे अनुदान मिळवून घेता येईल असे मार्गदर्शन केले आणि आम्ही डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षकांना एकत्र करून विविध आंदोलन केलो. त्यावेळेस सुद्धा बाल विकास शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक माननीय श्री साळुंके सर आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री शेळके सर हे उपस्थित राहायचे. म्हणूनच आज महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांना हक्काचा पगार मिळतोय याचा अतिशय आनंद होतो.शेळके सरांनी अतिशय अनमोल असं मार्गदर्शन केले त्यामुळेच आज सर्वांना हक्काचे अनुदान मिळाले आहे. हे आवर्जून मी या ठिकाणी सांगतो. तसेच वरील सर्व पदाधिकाऱ्यांमुळेच आज आम्हाला हक्काचे अनुदान मिळाले आहे. या ठिकाणी सांगू इच्छितो.
माझ्या सर्व शिक्षक बांधवांना,सहकाऱ्यांना हक्काची जुनी पेन्शन योजना लागू व्हावे यासाठी सर्व सहकाऱ्यांसोबत विविध आंदोलनामध्ये सुद्धा उपस्थित राहिले. असं श्रेष्ठ व्यक्तिमत्व आहे
लातूर जिल्हा खाजगी मुख्याध्यापक संघाचे प्रवक्ते म्हणून आज सर काम पाहत आहेत अतिशय उत्कृष्टपणे आपली भूमिका बजावताना दिसून येते.
शाळेचे प्रशासन कसे चालवावे याचा एक आदर्श नमुना म्हणजे आदरणीय श्री शेळके सर यांनी घालून दिला आज त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर शाळेचे कामकाज अगदी सुरळीतपणे चालत राहणार याचा सर्वांना विश्वास आहे.
सर नोकरीसाठी लातूरला आले पण गावातली माणसं, नाती जपण्याचं काम सरांनी केले. सरांना शेती विषयीची फार आवड शेतीमध्ये सातत्याने अनेक नव- नवीन प्रयोग करून अधिकाधिक उत्पन्न घेण्याचं काम सुद्धा करत असतात.
सर अगदी मनसोक्त जीवन जगतात. जीवनात संकट आली तरी केव्हाही न घाबरतात त्याच्यावर सहज मात करून आनंदी जीवन जगतात. सरांच्या स्वभावात राग, चेहऱ्यावर गंभीरता कधीच दिसून आली नाही. विद्यालयामध्ये कोणत्याही कर्मचाऱ्याला जाणून बुजून त्रास देणे. हे सरांच्या स्वभावात नाहीच.
विद्यालयामध्ये कोणतेही काम कर्मचाऱ्यांकडून करून घ्यायचे असेल तर अतिशय सहज आणि सरळ पद्धतीने सर सांगतात आणि ती काम कर्मचारी लगेच करतात. म्हणजेच काम करून घेण्याचे कौशल्य सरांकडे आहे. म्हणून सरस्वती विद्यालय शासकीय, प्रशासकीय कामात पुढे असते. इतर शाळा सुद्धा सरस्वती विद्यालयाचा आदर्श घेऊन काम करतात. हे त्याचे कारण आहे.
आम्ही ज्या ज्या वेळेस सरांकडे जातो. त्यावेळेस सर आमचं शांतपणे ऐकून घेतात आणि आम्हाला समजावून सांगतात. ही सरांच्या स्वभावातील अतिशय महत्त्वाचा गुण आहे. तो म्हणजे दुसऱ्याच्या विचाराचा आदर करणे आणि त्यांना प्रतिसाद देणे.
सरांनी शैक्षणिक कार्यामध्ये काम करत असताना निस्वार्थपणे विद्यार्थी घडवण्याचे काम केले. विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी, समस्या समजून घेऊन सतत सोडवण्याचा प्रयत्न केले. आणि म्हणून अनेक इंजिनीयर,डॉक्टर, आय आयटी इंजिनियर, प्राध्यापक,शिक्षक, एक आदर्श नागरिक घडवण्याचं काम सरांनी आत्तापर्यंत केले. आज पर्यंत अनेक पिढ्या घडवण्याचं काम सरांनी केलेल आहे. म्हणूनच सरांना अनेक पुरस्कारांनी आत्तापर्यंत सन्मानित करण्यात आलेला आहे.
1) लायन्स क्लब आदर्श शिक्षक पुरस्कार सन 1997
2) सरस्वती गौरव पुरस्कार सन 2003
3 ) महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार सन 2012
4) मा. विलासराव देशमुख ज्ञानरत्न पुरस्कार सन 2015
5) राष्ट्रीय वित्तीय साक्षरता प्रसारक पुरस्कार हस्ते डेप्युटी गव्हर्नर रिझर्व बँक ऑफ इंडिया (सलग तीन वर्ष 2016,2017,2018)
6) शिवरत्न उपक्रमशील शिक्षक पुरस्कार सन 2019
सरांनी केलेल्या चांगल्या कार्याचा वेळोवेळी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आलेला आहे. सरांनी केव्हाही पुरस्कारासाठी काम केले नाहीत. तर सतत विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम केले आणि अनेक विद्यार्थी घडले. सुरुवातीला सरस्वती विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी तीन रूम होत्या. आज अतिशय मोठी इमारत आणि भरपूर विद्यार्थी,कर्मचारी यांची संख्या आहे.आज मुख्याध्यापक म्हणून सर अतिशय उत्कृष्टपणे प्रशासन चालवत आहेत.आम्हा सर्वांचे एक आदर्श मुख्याध्यापक, एक मार्गदर्शक आहेत.आणि अशा सर्व त्यांच्या कार्यामुळेच त्यांना वरील सर्व पुरस्कारांनी वेळोवेळी सन्मानित करून त्यांच्या कार्याचा गौरव केलेला आहे.
याबद्दल आम्हा सर्वांना आदरणीय श्री. कालिदास हरिदास शेळके सर यांचा सार्थ अभिमान वाटतो.
सरांना पुढील निरोगी ,आरोग्यमय व दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो


श्री शामराव भानुदास लवांडे
मो.9823325700,9561932544
(सांस्कृतिक विभाग प्रमुख)
सरस्वती विद्यालय, खाडगाव, प्रकाश नगर,लातूर)
No comments