एकतेचे दर्शन! ५३ वर्षांची परंपरा जपली; गणेश मिरवणुकीत आरती केली, नंतर मुस्लिम बांधवांकडून भव्य पुष्पवृष्टी

 



एकतेचे दर्शन! ५३ वर्षांची परंपरा जपली; गणेश मिरवणुकीत आरती केली, नंतर मुस्लिम बांधवांकडून भव्य पुष्पवृष्टी

जळगाव: जळगाव भिलपुरा चौकी परिसरात सार्वजनिक गणेश मंडळाच्या मिरवणुकीवर मुस्लिम बांधवांकडून भव्य पुष्पवृष्टी करण्यात येऊन गणपतीची आरती करण्यात आली आहे. तर दुसरीकडे हिंदू बांधवांसह जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांकडून मुस्लिम बांधवांच्या दर्ग्यावर चादर चढवण्यात आली आहे. यातून हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन घडवण्यात आले आहे.
१९७० साली जळगाव शहरातील भीलपुरा परिसरात राहणारे सय्यद नियाज अली यांनी हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये एकोपा वाढवा या उद्देशातून रथ उत्सव तसेच गणेश उत्सवामध्ये मुस्लिम बांधवांनी सहभागी होण्याची परंपरा सुरू केली. या परिसरातून १९७० सालापासून जात असलेल्या रथावर मुस्लिम बांधवांकडून पुष्पवृष्टी केली जाते. त्यानंतर याच मार्गावरून जाणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळाच्या मिरवणुकीवर सुद्धा मुस्लिम बांधवांकडून भव्य अशी पुष्पवृष्टी केली जाते. तसेच आरती केली जाते. तर हिंदू बांधवांकडूनही या ठिकाणी हजरत पिरलाल शहा सरकार दर्ग्यावर चादर चढवली जाते.

तब्बल ५३ वर्षापासूनची परंपरा अद्यापही सुरू आहे. जळगाव शहरात यंदाही मोठ्या उत्साहात आणि भक्ती भावाने गणेश उत्सव साजरा करण्यात आला. आज ज्यावेळी सार्वजनिक गणेश मंडळाची विसर्जन मिरवणूक ही भिलपुरा परिसरात पोहोचली. त्यावेळी या मिरवणुकीवर मुस्लिम बांधवांकडून भव्य अशी पुष्पवृष्टी करण्यात आली. तर हिंदू बांधवांच्या वतीने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते हजरत पिरलाल शहा सरकार यांच्या दर्ग्यावर चादर चढविण्यात आली.

जळगाव जिल्ह्यात हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन घडवणारी ही परंपरा आजही कायम असल्याचे पाहायला मिळतं. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा हा पहिलाच गणेशोत्सव असल्याने त्यांनीही या हिंदू-मुस्लिम बांधवांच्या एकतेच्या परंपरेचे तसेच मुस्लिम बांधवांचे मोठं कौतुक केलं. तसेच इतरही हिंदू मुस्लिम बांधवांनी या परंपरेचा आदर्श घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. हे परंपरा अशीच पुढे जाण्यासाठी प्रशासनाच्या वतीने आम्ही प्रयत्नशील राहू असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post