शनिवारी भूकंपग्रस्त किल्लारीमध्ये भूकंपग्रस्तांचे तारणहार
शरद पवारांचा कृतज्ञता सोहळा : सक्षणा सलगर
लातूर : येत्या शनिवारी, दि. ३० सप्टेंबर २०२३ किल्लारीच्या महाप्रलयंकारी भूकंपास ३० वर्षे पूर्ण होत आहेत. त्याचे औचित्य साधून तत्कालिन कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री तथा भूकंपग्रस्तांचे तारणहार शरदचंद्र पवार यांच्या कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भूकंपग्रस्त कृती समितीच्या कु. सक्षणा सलगर यांनी बुधवारी सायंकाळी लातुरात पत्रकारांशी बोलताना दिली.
३० सप्टेंबर १९९३ च्या महाप्रलयंकारी भूकंपात लातूर व धाराशिव जिल्ह्यातील अनेक गावे उध्वस्त झाली. हजारो निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागले. या भूकंपाची वार्ता समजताच राज्याचे तत्कालिन मुख्यमंत्री शरद पवार अवघ्या दोन तासात भूकंपग्रस्त भागात धावून आले होते. भूकंपग्रस्त भागाच्या नवनिर्मितीसाठी स्वतः शरद पवारांनी पुढाकार घेतल्याच्या आठवणींना यावेळी उजाळा देण्यात आला. शरद पवारांनी त्यावेळी भूकंपग्रस्तांच्या भल्यासाठी जे केले त्याचे वर्णन करण्यास शब्दही अपूरे पडतात, असे सांगून सक्षणा सलगर यांनी शनिवारी सकाळी दहा वाजता किल्लारीच्या क्रांतीकारी मैदानावर हा कृतज्ञता सोहळा होणार असल्याचे सांगितले.
विनायकराव पाटील कवठेकर यांनी यावेळी बोलताना हा कृतज्ञता सोहळा पूर्णतः अराजकीय असल्याचे सांगितले. या सोहळ्यासाठी लातूर - धाराशिव जिल्ह्यातील सर्व आजी - माजी लोकप्रतिनीधींना निमंत्रित करण्यात आले आहे. शरद पवारांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. याचे निमंत्रण देण्यासाठी गेल्यानंतर त्यांनी अनेक आठवणींना उजाळा देण्याचे काम केल्याचे पाटील यांनी सांगितले. सुभाष पवार, अॅड. राहुल मातोळकर यासह अनेक मान्यवरांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या.
या पत्रकार परिषदेस राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस संजय शेटे, लातूर शहर जिल्हाध्यक्ष राजा मणियार, राज राठोड, अमर बिराजदार, नानाराव भोसले, प्रकाश पाटील, डी. उमाकांत यांची उपस्थिती होती.
Tags
लातूर