महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांना शिस्त लावण्याची गरज
संपुर्ण वर्षात गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, दसरा, ईद-ए-मिलाद, रमजान,अनेक नेत्यांच्या जयंती असे विविध धर्मांचे उत्सव आणि कार्यक्रम येत असतात, शहरातील उत्साही आणि होर्डिंग्ज लावण्यात आघाडीवर असलेले राजकीय नवोदित आणि जुने नेते या उत्सवाच्या काळात सर्व शहर विद्रुप करण्यामागे मेहनत घेत असतात, आज जर तुम्ही शहरात बघितले तर प्रत्येक सिग्नल वरती, नाक्या नाक्यावर आणि रस्त्यावर होर्डिंगने एवढा उच्छाद मांडला आहे की, ती लावताना सुद्धा काळजी घेतली गेलेली नाही, काही होर्डिंग सिग्नलच्या समोर लावली आहेत, त्यामुळे लोकांना सिग्नल दिसत नाहीत, अनेक होर्डिंग अशा जागेवर लावलेले आहेत की समोरचा रस्ताच दिसत नाही, काहींनी होर्डिंग फुटपाथवर लावल्यामुळे लोकांना फूटपाथ सोडून रस्त्यावर चालावे लागत आहे, काहींनी आपल्या नावाचा एवढा उदो उदो केलेला आहे की एकाच रस्त्यांवर 20 ते 25 होर्डिंग्ज एकाच व्यक्तीच्या आहेत, काहींनी तर ट्रॅफिकचे कायदे मोडून अश्या कमान लावल्या आहेत की रस्त्यावर चालणाऱ्या टू व्हीलर आणि फोर व्हिलर त्या कमानीला लागून जात असल्यामुळें अपघात होत आहेत. लोकांना आनंद होण्यापेक्षा या सणांची भीतीच जास्त वाटायला लागली आहे, आपली ईच्छा पूर्ण करण्यासाठी राजकारण्यांना लोकांचा जीव महत्त्वाचा वाटत नाही अशा बेशिस्त आणि अनधिकृत होर्डिंग्ज लावणाऱ्या राजकीय पक्षावर आणि नेत्यांवर कार्यवाही झाली पाहिजे.
बऱ्याच राजकीय पक्षांनी आणि संघटनांनी होर्डिंग बरोबर पक्षाचे झेंडे हे इलेक्ट्रिक लाईटच्या खांबांवर जसे काही जनतेवर उपकारच केले आहेत अशा अविर्भावात लावले जातात, त्यांचा कार्यक्रम झाल्यानंतरही ते झेंडे वर्षानुवर्षे असेच लटकत असतात आणि शहराच्या सौंदर्यावर घाला घालीत असतात, खरे तर कार्यक्रम झाल्यानंतर ते झेंडे आणि होर्डींग्ज आयोजकांकडून काढले गेले पाहिजेत परंतु तसे होताना दिसत नाही, या सर्व बेसिस्त वर्तनाला प्रशासन सुद्धा तितकेच कारणीभुत आहे,.
पोलीस आणि महानगरपालिका प्रशासन या दोन विभागाने जरी आपली जबाबदारी ईमानदारीने पार पाडली तरी बेकायदेशीर होर्डिंग्ज लावण्याची कुणाचीही हिम्मत होणार नाही, परंतु प्रशासनही आज-काल राजकारण्यांचे ऐकते आहे, त्यामुळे त्यांची हिंमत वाढली आहे, या हिमतीमुळे शहरातील सामान्य माणसाला त्रास होत आहे याची कुणालाही काळजी नाही, याची जबाबदारी जास्त करून हिंदू आणि मुस्लिम या धर्मीयांची आहे, आपल्या उत्साहाने शहरांचे विद्रूपीकरण तर झालेच आहे परंतु नाईस पोल्युशननेही खूप मोठ्या प्रमाणात ग्लोबल वॉर्मिग वाढले आहे, उत्साहाच्या नावाखाली सर्वांना मोकळे रान तयार झाले आहे, ज्यामुळे आज शहरावर कुणाचेही नियंत्रण राहिलेले दिसत नाही. डीजेच्या कर्कश आवाजामुळे अनेक लोकांना बहिरेपण आले आहे, त्यावर लावलेल्या लेझर किरणांमुळे डोळेही गेल्याचे उदाहरण आहे, काहींचा तर मोठ्या आवाजामुळे मृत्यू झाल्याच्या बातम्या सुद्धा समोर आल्या आहेत, एवढा त्रास आणि मृत्यू होत असतांना सुद्धा, उत्सवाच्या नावाखाली आज सर्वत्र धिंगाना चाललेला आहे, त्यामुळे आता शहरांना शिस्त लावण्याचे काम करावे लागणार आहे.
शांततेच्या मार्गाने ही आपण उत्सव साजरा करू शकतो, याचे भानच कुणाला राहिलेले नाही, एक काळ पूर्वीचा होता त्यावेळेस सात्विक पद्धतीने, मंत्रघोषाने, पारंपरिक ड्रेस परिधान करून, साज सजावट करत, रांगोळीची आरस घालून उत्सव साजरे केले जात होते, परंतु आज उत्सवाच्या नावाखाली चमकोगिरी करून, डिजेच्या तालावर तोकडे कपडे घालून, पोरी हातात दांडा धर, या अस्लील गाण्यांवर वेडेवाकडे नाचून, ऐका हातात मद्याची बाटली घेवून उत्सवाचा अपमान करीत, धर्माची चेष्टा चालविली आहे, यामुळे उत्सवाचे धार्मिक महत्त्व कमी होत आहे, याविषयी आज सर्वांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे, कारण आपण या सर्व उत्साहांच्या आणि जयंतीच्या नावाखाली मानवी आयुष्य, मूल्ये, परंपरा उध्वस्त करीत आहोत.
-चंदन पवार, सामाजिक कार्यकर्ता
No comments:
Post a Comment