देवीच्या दर्शनावरून परतणाऱ्या दोन भविकांवर काळाचा घाला
Two dead in Accident on Mumbai Goa highway: केळंबा देवीचे दर्शन घेऊन परत येणाऱ्या भाविकांच्या गाडीचा मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. यात दोघे जागीच ठार झाले आहे.
मुंबई: पेण तालुक्यातील केळंबा देवीचे दर्शन घेऊन येणाऱ्या भाविकांची गाडी नाल्यात कोसळल्यामुळे दोन जण जागीच ठार तर तिघे जण जखमी झाले आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर चिंचवण गावाच्या हद्दीत हा भीषण अपघात सोमवारी रात्री झाला. वाहन चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे
जीवन पाटील आणि रमेश पाटील असे या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. तर इतर जखमी नागरिकांची नावे समजू शकली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नवी मुंबईतील सानपाडा येथे राहणारे पाच जण पेण तालुक्यातील प्रसिद्ध खरोशी येथील केळंबा देवीचं दर्शन करून पाच जण येत होते. यावेळी मुंबई गोवा महामार्गावर चिंचवण गावाच्या हद्दीत त्यांच्या गडीवरील नियंत्रण सुटल्याने त्यांची गाडी ही नाल्यात कोसळली.
या भीषण अपघातात जीवन पाटील आणि रमेश पाटील या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर तिघे जण जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक जमा झाले. त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येत जखमींना उपचारासाठी स्थानिकांच्या मदतीनं रुग्णालयात दाखल केले. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.