परळीत बर्निग बसचा थरार.. प्रवाशांनी भरलेल्या धावत्या एसटी बसने अचानक घेतला पेट, पाहा
ST Bus Fire : परळी शहरात धावत्या बसने पेट घेतल्याने परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र चालकाच्या प्रसंगावधानाने अनेकांचे प्राण वाचले आहेत.
परळीमध्ये मोठी दुर्घटना टळली आहे. प्रवाशांनी खचाखच भरलेल्या एसटी बसने अचानक पेट घेतल्याने खळबळ माजली होती. मात्र सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले. ही बस (MH 06 BW 0913 ) लातूरहून प्रवाशी घेऊन परळी मार्गे परभणीकडे निघाली होती. पेट घेतलेली एसटी महामंडळाची बस वातानुकूलीत होती व यामध्ये २० प्रवासी प्रवास करत होते. चालकाने प्रसंगावधान राखत वेळीच बस थांबवल्याने प्रवाशी पटापट बसमधून बाहेर पडली. यामुळे मोठी जीवितहानी टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, वायरचे स्पार्किंग आणि टायर फुटल्यानेही दुर्घटना घडली.धावत्या बसने क्षणात पेट घेतल्याने आतमधील प्रवाशांनी आरडाओरडा केला. ही थरारक घटना परळीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शुक्रवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला आहे. बस वाहक व चालकाने गाडी वेळीच थांबवली आणि तत्काळ बस रिकामी केली. यामुळे कोणालाही दुखापत झाली नाही.
या बसमधून २० प्रवासी प्रवास करत होते. ही बस परभणी आगाराची आहे. आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली आहे. घटनेनंतर नगरपालिकेची अग्निशामक दलाची गाडी तत्काळ घटनास्थळी पोहोचली आणि आगीवर नियंत्रण मिळवले. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.