रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी आर्थिक मदत मिळणार—उदय सामंत
रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी आर्थिक मदत मिळणार—उदय सामंत
रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी आर्थिक मदत मिळणार—उदय सामंत
मुंबई, ५ जून, २०२४ : तापमान वाढीवर जालीम उपाय ठरू शकणाऱ्या बांबू शेतीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध असून त्यासाठी त्याचा औद्योगिक धोरणात समावेश करण्याबरोबरच सरकारी आस्थापनांमध्ये बांबूच्या वस्तूंचा वापर करून त्याला मार्केट उपलब्ध होण्यासाठी योग्य ती पाऊले उचलू, असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री श्री उदय सामंत यांनी आज केले.
“रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये बांबू शेती साथी अनुकूल वातावरण असून दोन्ही जिल्ह्यातून प्रत्येकी ५०० शेतकरी निवडून त्यांना बांबू शेती करण्यास उत्तेजन दिले जाईल. तसेच याकरता सरकारतर्फे त्यांना आर्थिक मदतही देण्याचे आश्वासन देतो,” श्री सामंत म्हणाले. ते जागतिक पर्यावरण दिनानिमित्त लातूर च्या फिनिक्स फाऊंडेशन संस्थेने मुंबईत आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते.
महाराष्ट्र सरकारतर्फे यापूर्वीच बांबू शेतीसाठी अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी दोन हेक्टर पर्यन्त बांबू लागवड करण्यासाठी ७ लाख रुपयांचे आणि विहीरीसाठी ४ लाख रुपयांचे अनुदान जाहीर केले असून या योजने अंतर्गत १० लाख हेक्टर बांबू शेतीचे लक्ष ठरवण्यात आले आहे. परंतु या योजनेत बसू न शकणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वर उल्लेख केलेला कार्यक्रम प्रायोगिक तत्वावर सुरू करण्याचा मानस श्री सामंत यांनी व्यक्त केला आहे.
तसेच राज्याच्या विविध आस्थापनांमध्ये फर्निचर आणि इतर वस्तु शक्य तिथे बांबूच्याच वापरण्याचा प्रयत्न केला जाईल असेही ते म्हणाले. राज्याच्या औद्योगिक धोरणामध्ये बांबूचा समावेश करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेण्याचा मनोदय देखील सामंत यांनी व्यक्त केला असून यासाठी सध्या चालू असलेली आचारसंहिता संपल्यावर बांबू क्षेत्रातील नामवंत व्यक्ति आणि संस्था यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाला प्रसिद्ध गृहनिर्माण कंपनी रुस्तमजीचे प्रमुख आणि बांधकाम उद्योगातील अग्रणी संस्था क्रेडाई चे राष्ट्रीय अध्यक्ष बोमन इराणी आणि महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष डॉमनिक रोमेल, गोदरेज समूहाच्या रती नादीर गोदरेज, सेंद्रिय शेती तज्ज्ञ पद्मश्री भरत भूषण त्यागी,पर्यावरण तज्ज्ञ डॉ आदिती मोदी आणि महाराष्ट्र कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री पर्यावरण टास्क फोर्स चे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल उपस्थित होते.
या प्रसंगी बोमन इराणी म्हणाले की, बांधकाम क्षेत्रात सुमारे २९ टक्के कार्बन उत्सर्जन होत असल्यामुळे या उद्योगाला प्रदूषण रोखण्यासाठी जोराचे प्रयत्न करणे गरजेचे आहे. याला आपली जबाबदारी समजून पुढील काळात पर्यावरण वाचवण्यासाठी क्रेडाईच्या १४००० सभासदांतर्फे बांबू लागवडीबरोबरच इमारत बांधकाम करताना शक्य तिथे धातू आणि इतर लाकडाऐवजी बांबू पासून तयार केलेले दरवाजे, खिडक्या, टाईल्स आणि इतर वस्तु वापरण्याला प्रोत्साहन दिले जाईल. मात्र त्यामुळे बांबू च्या वस्तूंना निर्माण होणारी प्रचंड मागणी पूर्ण करण्याकरता बांबू प्रक्रिया उद्योगाने तयार राहावे.
याप्रसंगी फिनिक्स फाऊडेशन च्या वतीने तयार करण्यात आलेल्या बांबू कल्पवृक्ष या विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला v तसेच लातूर येथील जगदंबा महिला बचत गटाच्या ज्योती शिंदे, फिरोजा दादन, मुंबईच्या पहिल्या सायकलिंग महापौर यांचा सत्कार करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. या वेळी संदीप बाजोरिया यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले, या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात शेतकरी व पर्यावरण प्रेमिंची उपस्थिती होती.
No comments