विशाळगड हिंसाचार: आतापर्यंत काय काय घडलं? कोणावर गुन्हे दाखल? - latursaptrangnews

Breaking

Wednesday, July 17, 2024

विशाळगड हिंसाचार: आतापर्यंत काय काय घडलं? कोणावर गुन्हे दाखल?

 


विशाळगड हिंसाचार: आतापर्यंत काय काय घडलं? कोणावर गुन्हे दाखल?


‘’काहीही कारण नसताना जमावानं हिंसक होऊन घरांची तोडफोड केली. 70-80 गाड्या फोडल्या आहेत. माणूस आजारी पडला तर रुग्णालयात जायला त्यांच्याकडे एक गाडी शिल्लक राहिली नाही. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक उपस्थित असताना गोरगरीब जनतेवर हल्ला झाला हे निषेधार्ह आहे. या अधिकाऱ्यांची चौकशी करायला पाहिजे.’’

विशाळगड इथल्या ज्या घरांवर हल्ला झाला, तोडफोड झाली तिथली परिस्थिती पाहून आलेले मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते उदय नारकर बीबीसी मराठीसोबत बोलताना पोलीस प्रशासनावर रोष व्यक्त करत होते.

विशाळगडावर नेमकं काय घडलं होतं? आणि या प्रकरणात आतापर्यंत कोणावर गुन्हा दाखल झालाय? पाहूया.


विशाळगडावर नेमकं काय घडलं होतं?

विशाळगडावरील अतिक्रमणाचा वाद जुना आहे. पण, याठिकाणी असलेला दर्गा जुना असल्यानं ते अतिक्रमण नाही असं मुस्लीम संघटनांचं म्हणणं आहे.

अतिक्रमणासंबंधी जे 6 प्रकरणं न्यायप्रविष्ट आहेत ते सोडून इतर 158 अतिक्रमणं का हटवत नाही? अशी संभाजीराजेंची मागणी होती. त्यासाठी त्यांनी रविवारी 14 जुलैला 'चलो विशाळगड' अशी हाक शिवप्रेमींना आणि त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांना दिली होती.

त्यामुळे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमा झाले होते. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडीत, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, उपाधीक्षक अप्पासाहेब पोवार उपस्थित होते.

विशाळगड हिंसाचार : आतापर्यंत काय काय घडलं? कोणावर गुन्हे दाखल?

फोटो स्रोत,@MICNEWDELHI

संभाजीराजे आणि पोलिसांमध्ये चर्चा सुरू असताना कार्यकर्ते आणखी मोठ्या संख्येनं जमले. पोलीस गडावर जाऊ देत नसल्यानं गडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर गावाकडे मोर्चेकरी गेले. याठिकाणी घरांवर दगडफेक झाली.

घरासमोर लावलेल्या दूचाकी, चारचाकी वाहनांची तोडफोड केली. यामध्ये एका घराली आग लावण्यात आली होती. तसेच गडाच्या पायथ्याशी काही लहान विक्रेते होते त्यांच्याही साहित्याची नासधूस केली. यामध्ये काही पोलीस देखील जखमी झाले आहेत.

मोर्चाला हिंसक वळण लागल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज करून जमावाला पांगवलं आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.

याप्रकरणात कोणावर गुन्हे दाखल झाले?

विशाळगड परिसरातील अतिक्रमण हटविण्यासाठी काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागलं. यामध्ये 400 ते 500 संशयितांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये 21 संशयितांना अटक करण्यात आली.

त्यांना कोर्टात हजर केलं असता तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

विशाळगडावर येण्यासाठी ज्यांनी हाक दिली त्या संभाजीराजेंवर गुन्हा दाखल झाला की नाही याबद्दल पोलिसांनी मात्र काहीही प्रतिक्रिया दिली नाही.

Yuvraj Sambhaji Chhatrapati

फोटो स्रोत,FACEBOOK/ YUVRAJ SAMBHAJI CHHATRAPATI

तसेच संभाजीराजे स्वतः सोमवारी शाहूवाडी पोलीस ठाण्यात गेले होते. यावेळी त्यांनी पोलिसांसोबत दीड तास चर्चा केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

ते म्हणाले, ‘’मी पोलिसांना विचारलं की माझ्यावर गुन्हा दाखल झाला आहे का? त्या शिवप्रेमींवर गुन्हा दाखल करण्यापेक्षा माझ्यावर करा. मी वारंवार एकच प्रश्न विचारला. पण, पोलिसांनी यावर हो किंवा नाही असं कुठलंही उत्तर दिलं नाही.’’

Yuvraj Sambhaji Chhatrapati

फोटो स्रोत,YUVRAJ SAMBHAJI CHHATRAPATI

सध्या विशाळगड परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त असून कोणालाही प्रवेश दिला जात नाहीये. इथले अतिक्रमण देखील हटवायला सुरुवात झाली आहे.

हिंसाचारानंतर शाहू महाराज काय म्हणाले?

कोल्हापूरचे खासदार आणि संभाजीराजेंचे वडील छत्रपती शाहू महाराज यांनी या घटनेचा निषेध नोंदवला.

त्यांनी एक पत्रक जारी केलं असून त्या ते म्हणतात, ‘’विशाळगड इथले अतिक्रमण हटवण्याच्या निमित्तानं झालेला हिंसाचार आमच्या मनाला प्रचंड वेदना देणारा आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कोल्हापुरात अशी घटना घडली हे क्लेशदायी आहे. संभाजीराजेंनी हे अतिक्रमण हटवण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली. परंतु, त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे हिंसाचार झाला त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो.’’

या घटनेला प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करत शाहू महाराज म्हणाले, ‘’विशाळगड प्रश्न गांभीर्यानं घेऊन माजी खासदार संभाजीराजे आणि मुख्यमंत्र्यांची चर्चा घडवून आणावी अशा सूचना जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रमुखांना दिल्या होत्या. पण, राज्य शासन, प्रशासन आणि पोलिसांना कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची योग्य ती खबरदारी गांभीर्याने घेतली नाही. त्यामुळे ही घटना घडली. हे जिल्हा प्रशासन व पोलिसांचे अपयश आहे. सरकारनं अतिक्रमण हटवण्यासाठी रविवारी जे आदेश दिले ते यापूर्वीच दिले असते तर अशी घटना घडली नसती.’’

इतकंच नाहीतर विशाळगडावरील अतिक्रमण दुजाभाव न करता सरसकट काढण्याची कारवाई प्रशासनानं करावी, अशी मागणीही शाहू मराजांनी केली. तसेच आज मंगळवारी शाहू महाराज विशाळगड परिसराला भेट देऊन पाहणी करणार आहेत. त्यांच्यासोबत सतेज पाटील देखील असणार आहेत.

शाहू महाराजांनी निषेध करताच संभाजीराजे काय म्हणाले?

शाहू महाराज यांनी संभाजीराजेंवर नाराजी व्यक्त करत झालेल्या घटनेचा निषेध नोंदवला आहे. याबद्दल संभाजीराजेंनी प्रतिक्रिया दिली. ‘’शाहू महाराज माझे वडील आणि कोल्हापूरचे खासदार आहेत. तसेच ते सर्वांचे महाराज आहेत. त्या नात्याने त्यांनी निषेध नोंदवला. मी त्यांच्या भूमिकेचा स्वीकार करतो. पण, त्यांनी माझी भूमिका काय होती? हे खासदार म्हणून प्रशासनाला सांगावं,’’ अशी विनंतीही संभाजीराजेंनी शाहू महाराजांना केली.

तसेच, ‘’माझं आणि महाराजांचं याविषयावर बोलणं झालं होतं. आपण कोल्हापूरला प्रशासनासोबत बैठक लावू, असं त्यांनी मला सांगितलं. पण, हा विषय वरिष्ठ पातळीवर सुटू शकतो, असं मी त्यांना सांगितलं. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावण्याचं ठरलं होतं. पण, राज्य शासनाने मला चर्चेसाठी बोलावलं नाही. त्यामुळे शाहू महाराजांनी प्रशासन आणि राज्य सरकारवर ओढलेले ताशेरे अगदी बरोबर आहेत’’, असंही संभाजीराजे म्हणाले.

दरम्यान, इथं सगळ्यांचे अतिक्रमण हटवले जात आहेत. पहिलं अतिक्रमण हिंदू व्यक्तीचं निघालं आहे. त्यामुळे या प्रकरणाला हिंदू-मुस्लीम असा जातीय रंग देऊ नका, असं आवाहनही त्यांनी केलं.

No comments:

Post a Comment