राजकीय पक्षांचा नवा वार, एकाच नावाचे अनेक उमेदवार

 

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

राजकीय पक्षांचा नवा वार, एकाच नावाचे अनेक उमेदवार


महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी चार नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस संपल्यानंतर सर्व मतदार संघातले उमेदवार आणि लढती स्पष्ट झाल्या आहेत.

त्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरू आहे. मात्र, यातच विधानसभा निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या नावाशी साधर्म्य असणारे उमेदवार निवडणुकीत उभे करून मतदारांमध्ये गोंधळ निर्माण करण्याचं लोण आता राज्यभरात पसरलं आहे.

राज्यातील 288 पैकी 50 हून अधिक विधानसभा मतदारसंघांत महायुती आणि महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवाराच्या नावाचेच उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे मतदार संभ्रमात पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे राजकीय पक्षांचीही डोकेदुखी वाढली आहे.

नाव एक, उमेदवार अनेक!

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे इस्लामपूर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. तिथं जयंत पाटील नावाचे दोन उमेदवार असून त्यापैकी एका उमेदवाराचे नाव जयंत राजाराम पाटील असं आहे.

अजित पवार गटाने याच मतदारसंघातून निशिकांत पाटील यांना उमेदवारी दिली असून त्यांच्या नावाशी साम्य असलेले दोन उमेदवार रिंगणात आहेत.

नगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेडमध्ये भाजपच्या प्रा. राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे रोहित पवार यांच्यात लढत असून इथे राम शिंदे नावाचे दोन, तर रोहित पवार नावाचा एक उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहे.

तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघात दिवंगत उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचे चिरंजीव पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवत आहेत. इथे रोहित आर. पाटील नावाचे तीन उमेदवार आहेत.

अलिबाग मतदारसंघात शिंदे गटाच्या महेंद्र दळवी यांच्या नावाशी साम्य असलेले तीन उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत.

रायगड जिल्ह्यातल्या कर्जतमध्ये शिंदे गटाचे महेंद्र थोरवे आणि उरणमध्ये शिवसेनेचे उमेदवार मनोहर भोईर यांच्या नावाशी साधर्म्य असलेले उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

मानखुर्द-शिवाजीनगरमध्ये अजित पवार गटाचे नवाब मलिक हे अधिकृत उमेदवार असून येथेही नवाब मलिक नावाचे अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत.

मुंबईतील चांदिवलीमध्ये शिंदे गटाचे दिलीप लांडे यांच्या नावाशी साम्य असणारा अपक्ष उमेदवार रिंगणात आहे.

वांद्रे पूर्वमध्ये झिशान सिद्दिकी यांच्या नावाशी साम्य असणारा अपक्ष निवडणूक लढवत आहे.

नवी मुंबईत बेलापूरमध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संदीप नाईक यांच्यात मुख्य लढत आहे. येथे मंदा म्हात्रे आणि संदीप नाईक नावाचे अपक्ष उमेदवार आहेत.

अंबरनाथमध्ये राजेश वानखेडे शिवसेनेचे उमेदवार आहेत. याच राजेश वानखेडे नावाचे अपक्षही उभे आहेत.

दापोली मतदारसंघात शिंदे गटाचे योगेश कदम या नावाशी तंतोतंत साम्य सांगणारा उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहे. याशिवाय आणखी एक उमेदवार आहे.

शिवसेनेचे संजय वसंत कदम यांच्या नावाशी साम्य असलेले दोन उमेदवार अपक्ष म्हणून उभे आहेत.

चिपळूणमध्ये अजित पवार गटाचे शेखर निकम आणि राष्ट्रवादीचे प्रशांत यादव यांच्या नावाशी साम्य असलेले उमेदवार आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे सत्यजित बाबासाहेब पाटील निवडणूक लढवत आहेत. येथे सत्यजित पाटील नावाचे दोन अपक्ष उमेदवार आहेत.

कोरेगावमध्ये शिंदे गटाच्या महेश शिंदे यांच्या नावाशी साम्य असलेले तीन अपक्ष उमेदवार आहेत.

सांगलीत जयश्री पाटील नावाच्या तीन उमेदवार आहेत.

माजी मंत्री एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे निवडणूक लढवत असलेल्या मुक्ताईनगरमधून दोन रोहिणी खडसे अपक्ष म्हणून उभ्या आहेत.

तसेच शिंदे गटाच्या चंद्रकांत पाटील यांच्या नावाचे दोन उमेदवार अपक्ष म्हणून नशीब आजमावत आहेत.

विदर्भातील बुलढाणा विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाच्या जयश्री शेळके यांच्या नावाच्या दुसऱ्या अपक्ष उमेदवार देखील आहेत.

चिखली विधानसभेत काँग्रेसचे राहुल बोंद्रे यांच्याच नावाचे अपक्ष एक व्यक्ती उभे आहेत
साक्री विधानसभेत काँग्रेसचे प्रवीण चौरे यांच्या नावाचे दुसरे अपक्ष उमेदवार उभे आहेत

जळगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये ठाकरे गटाकडून जयश्री महाजन उभ्या आहेत त्यांच्याच नावाची एक अपक्ष महिला उमेदवार उभी आहे

जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे गुलाबराव पाटील उमेदवार उभे आहेत त्यांच्याच नावाचा एक अपक्ष उमेदवार उभा आहे.

अमळनेर विधानसभा मतदारसंघांमध्ये अनिल पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत, त्यांच्याही नावाचा एक अपक्ष उमेदवार रिंगणात आहे.

एरंडोल विधानसभा मतदार संघात अण्णासाहेब पाटील शरदचंद्र पवार गटाकडून उभे आहेत. त्यांच्या नावाचा एक अपक्ष उमेदवार रिंगणात आहे

चाळीसगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे मंगेश चव्हाण उभे आहेत, त्या ठिकाणी मंगेश चव्हाण हे अपक्ष उमेदवार उभे आहेत

पाचोरा विधानसभा मतदारसंघांमध्ये ठाकरे गटाकडून वैशाली सूर्यवंशी उभ्या आहेत तर दुसरीकडे वैशाली सूर्यवंशी या अपक्ष दुसरा उमेदवार आहेत.

सावनेर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आशिष देशमुख उभे आहेत त्यांच्याच नावाचे दुसरे अपक्ष उमेदवार देखील रिंगणात आहेत

भोकर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे तिरुपती कदम उभे आहेत. त्यांच्याच नावाचे अपक्ष उमेदवार देखील आहेत

लोहा विधानसभा मतदारसंघात एकनाथ दादा पवार हे ठाकरे गटाकडून उभे आहेत. त्यांच्याही नावाचा एक अपक्ष उमेदवार उभा आहे

महाविकास आघाडी

फोटो स्रोत,Getty Images

गंगाखेड विधानसभा मतदारसंघात विशाल कदम हे ठाकरे गटाकडून उभे आहेत तर अपक्ष देखील त्यांच्या नावाचा एक उमेदवार उभा आहे

कन्नड विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या संजना जाधव रिंगणात आहेत तर बहुजन समाजवादी पार्टीकडून देखील संजना जाधव या उमेदवार आहेत

नांदगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये ठाकरे गटाचे गणेश धात्रक आणि शिंदे गटाचे सुहास कांदे या दोन्ही उमेदवारांच्या नावाचे अपक्ष उमेदवार हे रिंगणात आहेत.

कळवण विधानसभा मतदारसंघात नितीन पवार हे राष्ट्रवादीकडून उमेदवार आहेत तर अपक्ष त्यांच्याच नावाचा एक उमेदवार रिंगणात आहे

नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून गणेश गीते हे मतदारसंघात शरद पवार गटाकडून उभे आहेत मात्र अपक्ष देखील त्यांच्या नावाचा एक उमेदवार उभा आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील शिरूर, आंबेगाव, दौंड, मावळ, वडगावशेरी, करमाळा, माढा येथे व इतर विधानसभा मतदारसंघात हीच स्थिती आहे.

'नव्वद'नंतर दिसू लागला डबल नावांचा पॅटर्न

महाराष्ट्रात साधारणतः 1990 नंतर निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या मतांची विभागणी करण्यासाठी नाम साधर्म्य असलेले उमेदवार अपक्ष म्हणून उभे करण्याची सुरुवात झाली, असं राजकीय विश्लेषक रवीकिरण देशमुख सांगतात.

“2004च्या विधानसभा निवडणुकीत रायगड मधील अलिबाग विधानसभा मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाच्या मीनाक्षी पाटील या उमेदवार होत्या. त्याचवेळी मीनाक्षी पाटील नावाच्या सहा उमेदवार अपक्ष म्हणून अलिबागमधून निवडणूक लढवत होत्या. या सहा अपक्ष उमेदवारांना मिळालेल्या मतांचा फायदा त्यावेळी काँग्रेस उमेदवाराला झाला होता.”

महायुती

फोटो स्रोत,Getty Images

नावाशी साधर्म्य असणाऱ्या उमेदवारांमुळे बसतो फटका

यापूर्वीही अनेक निवडणुकांमध्ये अशा प्रकारे काही मतदारसंघांमध्ये साधर्म्य असणारे उमेदवार उभे असल्याच पाहायला मिळालं आहे. या 2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील अनेक मतदारसंघांमध्ये नावाशी साधर्म्य असणाऱ्या उमेदवारांमुळे काही प्रमाणात फटका बसण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करतात.

“कधीकधी प्रतिस्पर्धी राजकीय पक्षांचे उमेदवार हे समोरच्या उमेदवाराला फटका बसण्यासाठी त्यांच्याच नावाचे असे डमी उमेदवार उभे करतात,” असं निरिक्षण रवीकिरण देशमुख नोंदवतात. रविकरण देशमुख यांनी २०१४ ते २०१९ दरम्यान महाराष्ट्राचे तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे माध्यम सल्लागार म्हणून देखील काम पाहिलं आहे.

राज्यात 4136 उमेदवारांमध्ये होणार लढत...

राज्यात एकूण 288 मतदार संघांमध्ये 4136 उमेदवार रिंगणात आहेत. यापैकी पुरुष 3771 तर महिला 363 उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर इतर दोन उमेदवार हे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर साधारण चार नोव्हेंबरपर्यंत पंधराशेहून अधिक उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला.

या वापरल्या जातात युक्त्या

गेल्या काही वर्षांमध्ये निवडणुकीची चुरस वाढल्यामुळे अनेक उमेदवार विविध युक्त्या वापरत विजय कसा प्राप्त करता येईल याकडे भर देतात.

यामध्येच एका नावाचे अनेक उमेदवार उभे करण्याबरोबरच वोटींग मशीनवर आपलं नाव पुढे यावे, यासाठी उमेदवारांकडून अर्ज भरताना काही डिग्री किंवा उपाध्या या मुद्दाम नावापुढे लावल्या जातात.

उदाहरणार्थ, अभियंता भास्करराव पाटील खतगावकर यांनी आपलं नाव वोटींग मशीन वर पुढे यावं यासाठी अभियंता हे नावापुढे निवडणूक लढवताना अनेकदा लावले. त्यामुळे त्यांचे नाव वोटींग मशीनवर पुढे येऊ लागले. अशाच प्रकारे याही निवडणुकीत काही उमेदवारांनी आपल्या नावापुढे एखादं टोपण नाव वा उपाध्या जोडून आपलं नाव पुढे कशाप्रकारे आणता येईल, यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवल्या आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

फोटो स्रोत,Getty Images

फोटो कॅप्शन,महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

दोन निवडणूक चिन्हातील काही साम्यामुळे उमेदवारांना फटका

मागील लोकसभा निवडणुकीत दोन निवडणूक चिन्हातील साम्यामुळे उमेदवारांना फटका बसल्याचं दिसून आलं आहे. यातूनच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा उमेदवार काही मतांच्या फरकाने पडला.

तर आता शरद पवार यांचा पक्ष निवडणूक लढवत असलेल्या काही मतदारसंघांत 'तुतारी वाजवणारा माणूस' आणि अपक्ष उमेदवरांचं 'ट्रम्पेट' चिन्हं आमने- सामने आलं आहे. यामध्ये अहमदनगर शहर, शेवगाव, पारनेर, कोपरगाव, कर्जत, अकोले या मतदारसंघांचा समावेश आहे.

एकाच नावाचा दुसरा उमेदवार उभा असण्याचा फटका सुनील तटकरे यांना बसला होता.

फोटो स्रोत,Facebook/Sunil Tatkare

फोटो कॅप्शन,एकाच नावाचा दुसरा उमेदवार उभा असण्याचा फटका सुनील तटकरे यांना बसला होता.

त्यामुळे मतदारांमध्ये चिन्हाविषयी देखील संभ्रम निर्माण होऊन याचा फटका बसण्याची शक्यता आहे, असं राजकीय जाणकार सांगतात.

हा पॅटर्न रायगडमधून सुरू झाला

नामसाधर्म्य उमेदवार उभे करण्याच्या पॅटर्न रायगडमधून सुरू झाल्याची चर्चा आहे. त्यासाठी बीबीसी मराठीनं रायगडस्थित पत्रकार हर्षद कशाळकर यांच्याशी संपर्क केला. त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, “रायगडमध्ये हा पॅटर्न 1991 पासून कायम सुरू आहे.

माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांच्या विरोधात 1991 च्या लोकसभा निवडणुकीत शेकापने अ‍ॅड. दत्ता पाटील यांना उभं केलं होतं. त्यावेळी त्यांच्याच नावाचा म्हणजे दत्ता पाटील नावाचा दुसरा एक उमेदवार रिंगणात उतरला होता. याचा मोठा फटका शेकापचे दत्ता पाटील यांना बसला. 2014 निवडणुकीतही असाच प्रकार घडला होता. राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे हे केवळ 2100 मतांनी पराभूत झाले होते.

त्यांच्याच नावाप्रमाणे नाव असलेल्या सुनील तटकरे या दुसऱ्या उमेदवाराला तेव्हा 9849 मते तर दुसऱ्या अपक्ष सुनील तटकरे या उमेदवाराला 2500 हून अधिक मते मिळाली होती. त्यानंतर रायगडचा हाच पॅटर्न पुढे राज्यभर पसरला असून अनेक विधानसभेत वापरला जाऊ लागला आहे. त्यामुळे, त्याचा मोठा फटका मुख्य उमेदवाराला बसतो,” असं हर्षद कशाळकर सांगतात.

Post a Comment

Previous Post Next Post