‘व्हीव्हीपॅट’मधील सर्व चिठ्ठ्या मोजा! पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी - latursaptrangnews

Breaking

Monday, December 2, 2024

‘व्हीव्हीपॅट’मधील सर्व चिठ्ठ्या मोजा! पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

 


‘व्हीव्हीपॅट’मधील सर्व चिठ्ठ्या मोजा! पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी


पुणे : ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचा निकाल एकच आहे, तर मग व्हीव्हीपॅटमधील सर्व चिठ्ठ्या मोजायला हव्यात, अशी मागणी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, ईव्हीएममध्ये गडबड असून आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची तपासणी करावी. तसेच भविष्यात ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर निवडणुका घ्यायला हव्यात. आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांकडून ईव्हीएमची तपासणी करायला हवी. हीच आमची प्रमुख मागणी आहे. तेव्हाच जनतेचा १०० टक्के विश्वास निवडणूक आयोगावर बसेल, असेही चव्हाण म्हणाले. राज्यातील निकाल अनपेक्षित लागलेत. एखादी हवा असेल तर नक्कीच उमेदवारांना अंदाज येतो, तेव्हा असा निकाल लागू शकतो. पण लोकसभेतील निकाल आणि विधानसभेचा निकाल यात मोठी तफावत आहे. लोकसभा आणि विधानसभेतील मतदानाची टक्केवारी पाहता, हा झालेला मोठा बदल संशयास्पद आहे. लोकसभेतील ज्या मतदारांनी महायुती विरोधात मतदान केले. तेच मतदार अवघ्या ४ महिन्यात त्यांच्या बाजूने कसे काय मतदान करू शकतात, असा सवाल त्यांनी केला.

सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांच्या ईव्हीएमविरोधी आंदोलनाला देशातून पाठिंबा मिळत आहे. त्यांना माझा आणि काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा देण्यासाठी मी येथे आलो असल्याचे चव्हाण म्हणाले.

निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा या दोघांच्या संमतीने निवडणूक आयोगाचे अधिकारी नेमले जातील, असा कायदा लोकसभेत पारित केला गेला. तेव्हाच आम्हाला वाटले होते, आता निवडणुका पारदर्शी होणार नाहीत? आणि अपेक्षेनुसार हेच घडल्याचे चव्हाण म्हणाले.

ईव्हीएममध्ये गडबडीचे ठोस पुरावे मिळणे कठीण

ईव्हीएममध्ये गडबड आहे. पण याबाबतचा ठोस पुरावा मिळणे कठीण आहे. मशीनमध्ये फेरफार केले असल्यास सिद्ध कसे करणार ? मुळात ईव्हीएम मशीन विरोधकांच्या हातात द्या ना? शरद पवार गटाला लोकसभेत मिळालेले यश पाहता विधानसभेत इतके अपयश मिळेल का? यावर संशोधन करायची गरज आहे, असे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment