गीयन बारे सिंड्रोम काय आहे, तो कसा वाढत जातो, त्यामागची कारणं काय आहेत? वाचा

 


गीयन बारे सिंड्रोम काय आहे, तो कसा वाढत जातो, त्यामागची कारणं काय आहेत? वाचा


गेल्या महिन्यात पुण्यातील एका शालेय शिक्षिकेला तिचा सहा वर्षांचा मुलगा होमवर्क करताना अस्वस्थ असलेला दिसला.

"मी काही शब्द खोडून ते त्याला पुन्हा लिहिण्यास सांगितले. मला वाटलं की तो रागावलेला आहे. त्यामुळेच तो पेन्सिल हातात नीट पकडत नसावा," असं त्यांनी इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राला सांगितलं.

त्यांना या गोष्टीची कल्पनाच नव्हती की त्यांचा मुलगा हातात पेन्सिल नीट धरू शकत नाही हे गीयन बारे सिंड्रोमचं (GBS) पहिलं लक्षण आहे. हा एक दुर्मिळ आजार आहे.

त्यात शरीराची रोगप्रतिकारशक्ती मज्जासंस्थेवर हल्ला करते. त्यामुळे स्नायूंना कमकुवतपणा येतो आणि पक्षाघात (Paralysis) होतो.


काही दिवसांतच त्या शिक्षकेच्या मुलाला अतिदक्षता विभागात दाखल करावं लागलं. त्याला त्याच्या हात आणि पायांची हालचाल करता येत नव्हती.

त्याची प्रकृती बिघडत असतानाच, त्याला गिळण्यास, बोलण्यास आणि नंतर श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.

त्यासाठीची त्याची क्षमता कमी होत गेली. परिणामी त्याला व्हेंटिलेटरवर ठेवावं लागलं. आता त्याच्या प्रकृतीत सुधारणा होते आहे.

पुण्यातील गीयन बारे सिंड्रोमचा उद्रेक

पुणे हे औद्योगिक शहर, शहराभोवती औद्योगिक वसाहती आणि गावं आहेत. तसंच पुणे हे शैक्षणिक आणि आयटी हब देखील आहे. जानेवारीच्या सुरुवातीपासून पुण्यात नोंद झालेल्या गीयन बारे सिंड्रोमच्या (GBS) जवळपास 160 रुग्णांपैकी तो मुलगा एक आहे. या आजारानं पाच जणांचा मृत्यू झाल्याची शंका आहे.

अधिकृत आकडेवारीनुसार, सध्या 48 रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत. 21 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत तर 38 रुग्णांना हॉस्पिटलमधून घरी पाठवण्यात आलं आहे.

विषाणूचं ग्राफिक

फोटो स्रोत,Getty Images

गीयन बारे सिंड्रोम या आजाराची सुरुवात हात आणि पायांना मुंग्या येणं किंवा सुन्नपणा येणं यातून होते. त्यानंतर रुग्णाचे स्नायू कमकुवत होतात आणि सांध्याची हालचाल करण्यास त्रास होतो.

ही लक्षणं दोन ते चार आठवड्यांमध्ये अधिक गंभीर होत जातात. त्याची सुरुवात साधारणपणे हात आणि पायांपासून होते. या आजाराचा नोंदवलेला मृत्यूदर 3 ते 13 टक्क्यांच्या दरम्यान आहे. आजाराची तीव्रता आणि आरोग्य सेवा व्यवस्थेची गुणवत्ता यानुसार तो बदलतो.

पुण्यात गीयन बारे सिंड्रोम आजाराच्या प्रादूर्भावाचा संबंध कॅम्पीलोबॅक्टर जेजुनी (campylobacter jejuni) नावाच्या जंतूशी असल्याचं आढळून आलं आहे.

अन्नातून होणाऱ्या संसर्गाचं देखील हा जंतू हे एक प्रमुख कारण आहे. जगभरात या जंतूमुळे सर्वाधिक प्रमाणात गीयन बारे सिंड्रोम आजार होतो.

चीन, पेरू, ब्राझीलसह भारतातील प्रादुर्भाव

1990 च्या दशकात चीनच्या ग्रामीण भागात हा जंतू आणि गीयन बारे सिंड्रोम आजाराचा संबंध आढळला. तिथे कोंबड्यांमध्ये हा जंतू सर्रास आढळायचा. दरवर्षी पावसाळ्यात मुलं जेव्हा कोंबड्या किंवा बदकाच्या विष्ठेनं दूषित झालेल्या पाण्यात खेळायची तेव्हा त्यातून गीयन बारे सिंड्रोमचा प्रादूर्भाव होत असे.

भारतात गीयन बारे सिंड्रोम हा आजार पूर्णपणे सामान्य नाही. बंगळूरच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ आणि न्युरोसायन्सेस (NIMHANS)च्या मोनोजित देबनाथ आणि मधू नागप्पा यांनी 2014 ते 2019 या पाच वर्षांच्या कालावधीत गीयन बारे सिंड्रोमच्या 150 रुग्णांचा अभ्यास केला.

त्यांच्या अभ्यासातून असं आढळलं की गीयन बारे सिंड्रोमच्या 79 टक्के रुग्णांमध्ये आधी संसर्ग झाल्याचे पुरावे होते. त्यात चाचणी केलेल्या रुग्णांपैकी दर तिसऱ्या रुग्णाला कॅम्पीलोबॅक्टरचा संसर्ग झाल्याचं दिसून आलं.

लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे, त्यात सह-संक्रमण अधिक सामान्य होतं. ते 65 टक्के रुग्णांमध्ये दिसून आलं. यातून जिवाणू आणि विषाणू यांच्यातील गुंतागुंतीच्या परस्परसंवाद सूचित होतो.

जेजुनी

फोटो स्रोत,Getty Images

फोटो कॅप्शन,पुण्यातील गीयेन बारे सिंड्रोमचा उद्रेक कॅम्पीलोबॅक्टर जेजुनी या जिवाणूमुळे झाल्याचं आढळून येतं आहे

अलीकडच्या काळात, जंतूमुळे होणाऱ्या आजारांचा प्रादूर्भाव किंवा उद्रेक संपूर्ण जगभरातून नोंदवले गेले आहेत. 2023 च्या पहिल्या सात महिन्यांमध्ये, पेरू देशात गीयन बारे सिंड्रोम आजाराचे 200 हून अधिक संशयित रुग्ण आढळले आणि त्यात किमान चार जणांचा मृत्यू झाला.

त्यामुळे पेरूच्या सरकारला राष्ट्रीय आरोग्य आणीबाणी जाहीर करावी लागली. तसंच सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी पावलं उचलावी लागली. यातील दोन तृतियांश रुग्ण कॅम्पीलोबॅक्टरशी संबंधित होती.

तज्ज्ञांच्या मते, ज्या देशांमध्ये चांगली स्वच्छता राखली जाते, तिथे कॅम्पीलोबॅक्टरशी निगडीत गीयेन बारे सिंड्रोमचे कमी रुग्ण आढळतात. त्यात श्वसनसंस्थेतून होणारा संसर्ग हे प्रमुख कारण आहे.

हा आजार होण्यासाठी इतर कारणंदेखील आहेत. 2015 मध्ये ब्राझीलमध्ये झिका विषाणूमुळे गीयन बारे सिंड्रोम आजार झालेल्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. लसीमुळे क्वचितच गीयन बारे सिंड्रोम होऊ शकतो. मात्र 2021 मध्ये युकेमध्ये गीयन बारे सिंड्रोमच्या शेकडो रुग्णांचा संबंध कोरोनाच्या लसीशी असल्याचं वृत्त समोर आलं होतं.

जीबीएससाठी कॅम्पीलोबॅक्टर जिवाणू कारणीभूत

"कॅम्पीलोबॅक्टर हा जंतू स्थानिक स्वरूपाचा असून त्याचे लाखो रुग्ण नेहमीच आढळतात. तो पर्यावरणात नेहमीच असतो," असं ह्यू विलिसन यांनी मला सांगितलं. ते ग्लासगो विद्यापीठात न्युरोलॉजीचे प्राध्यापक आहेत.

तरीदेखील गीयन बारे सिंड्रोम आजार होणं सोपं नाही, असं वैज्ञानिक म्हणतात.

कॅम्पीलोबॅक्टरचा एक विशिष्ट प्रकार असतो, ज्यात बाह्य थरावर साखरेचं आवरण असतं. काही दुर्मिळ प्रसंगी कॅम्पीलोबॅक्टरची आण्विक रचना मानवी मज्जासंस्थेतील पेशींच्या आवरणाशी जुळते.

जेव्हा रुग्णाची रोगप्रतिकार शक्ती जीवाणूंवर हल्ला करते, तेव्हा ती शरीरातील मज्जासंस्थेतील पेशींवरदेखील हल्ला करते. कॅम्पीलोबॅक्टर जंतूची आण्विक रचना आणि मज्जासंस्थेतील पेशींची रचना क्वचितच प्रसंगी सारखीच असल्यामुळे तसं होतं.

पुण्याजवळील एक पोल्ट्री फार्म

फोटो स्रोत,Getty Images

फोटो कॅप्शन,पुण्याजवळील एक पोल्ट्री फार्म - जागतिक पातळीवर गीयन बारे सिंड्रोमच्या प्रकरणांचा संबंध अर्धवटरीत्या शिजवलेल्या चिकन किंवा पोल्ट्री उत्पादनांशी दिसून आला आहे

या प्रक्रियेला आण्विक नक्कल किंवा मॉलेक्युलर मिमिक्री (molecular mimicry) म्हणतात. त्यातून गीयन बारे सिंड्रोम हा आजार होतो. अर्थात, फार थोड्या कॅम्पीलोबॅक्टर जंतूंची आण्विक रचना मज्जासंस्थेतील पेशींप्रमाणे असते.

"पुण्यात हीच वैशिष्ट्यपूर्ण आण्विक रचना असलेला कॅम्पीलोबॅक्टर जंतूचा प्रादूर्भाव झाला असण्याची शक्यता आहे. या प्रकारच्या कॅम्पीलोबॅक्टर जंतूच्या संसर्गात वाढ झाल्यामुळे परिणामी गीयन बारे सिंड्रोमच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होते," असं प्राध्यापक विलिसन म्हणतात.

बहुतांश तज्ज्ञांचा अंदाज आहे की जवळपास 100 पैकी एका कॅम्पीलोबॅक्टर जंतूमुळे गीयन बारे सिंड्रोम आजार होण्याचा धोका असतो. तर अशा जंतूचा संसर्ग झालेल्या 100 पैकी एका व्यक्तीला गीयन बारे सिंड्रोम होतो. त्यामुळे एकूणच 10,000 लोकांमध्ये एका व्यक्तीला हा आजार होण्याचा धोका असतो.

या आजारात शरीरात नेमकं काय होतं?

यातून जे निर्माण होतं, त्याचं वर्णन प्राध्यापक विलिसन "इम्युनोलॉजिकल रशियन रूलेट" (immunological Russian roulette) असं करतात.

"अ‍ॅक्युट न्युरोलॉजिकल त्सुनामी" सुरू होते. म्हणजे मज्जासंस्थेशी संबंधित आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ लागतात. ही अवस्था मज्जासंस्थेच्या परिघावर पसरते.

एकदा का शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीची त्यावरील प्रतिक्रिया कमी झाली की हा हल्ला कमी होतो. मात्र त्यातून सावरायला, ते नुकसान भरून काढायला शरीराला वेळ लागतो, वैद्यकीय मदत लागते आणि झीज भरून काढायला मदत लागते.

यातील सर्वात गंभीर आणि परिस्थिती बिकट करणारी बाब म्हणजे गीयन बारे सिंड्रोमवर कोणतेही उपचार नाहीत.

गीयन बारे सिंड्रोममध्ये शरीरात झालेल्या कॅम्पीलोबॅक्टर जंतूच्या संसर्गाविरुद्ध शरीर अँटीबॉडीज तयार करतं. या अँटीबॉडीज मग मज्जातंतूवर हल्ला करतात.

शरीरातील हानिकारक अँटीबॉडीजबरोबर इंट्राव्हिनस इम्युनोग्लोबुलिन (IVIG) काढून टाकण्यासाठी डॉक्टर्स रक्ताचं शुद्धीकरण करण्याची एक प्रक्रिया करतात, त्याला "प्लास्मा एक्सचेंज" असं म्हणतात.

इंट्राव्हिनस इम्युनोग्लोबुलिन (IVIG)ही अँटीबॉडी सामान्य रक्तातून मिळवलेली असते. गीयन बारे सिंड्रोम आजाराची तीव्रता कमी करण्यासाठी त्याची मदत होते.

दुसरं आव्हान म्हणजे, गीयन बारे सिंड्रोमचं निदान करण्यासाठी कोणतीही एक चाचणी नाही. डॉक्टर्स म्हणतात की या आजाराचं निदान हे मुख्यत: वैद्यकीय लक्षणांवर आधारित असतं. हा आजार पक्षाघाताच्या स्वरुपात येतो. असा पक्षाघात पोलिओ सारख्या आजारामुळे,

विषाणू किंवा दुर्मिळ न्युरोलॉजिकल आजारांमुळे देखील होऊ शकतो.

"या आजारासाठीचं निदान हे वैद्यकीय लक्षणांच्या समूहातून केलं जातं. त्यामुळे या आजाराचं निदान न होणं किंवा चुकीचं निदान होणं किंवा उशिरा निदान होणं यासारख्या गोष्टी सहजपणे होऊ शकतात," असं प्राध्यापक विलिसन म्हणतात.

आरोग्य व्यवस्थेसमोरचं आव्हान

भारतातील असमान सार्वजनिक आरोग्य व्यवस्था हे एक आव्हान आहे. कारण ग्रामीण भागातील डॉक्टर्सना गीयन बारे सिंड्रोमचं निदान करण्यात अडचणी येऊ शकतात. पुण्यात जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO)टीम आल्या आहेत.

त्यामागचं एक कारण म्हणजे केंद्रीय आणि राज्य सरकारच्या पातळीवरील आरोग्य कर्मचाऱ्यांबरोबर सहकार्य करत या आजारासंदर्भात काम करणं.

प्रभावी उपचार पुरवण्याच्या कामात मदत म्हणून रुग्णांचा शोध घेणं, त्यांच्या चाचण्या करणं आणि रुग्णांवर लक्ष ठेवणं आणि आजाराशी संबंधित ट्रेंडचं विश्लेषण करणं या गोष्टींचा यात समावेश आहे.

अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की त्यांनी 60,000 हून अधिक घरांचं सर्वेक्षण केलं आहे. चाचणी करण्यासाठी पाण्याचे 160 नमुने घेतले आहेत.

तसंच लोकांना पाणी उकळून पिण्याच्या, ताजं आणि स्वच्छ अन्न खाण्याच्या सूचना केल्या आहेत. त्याचबरोबर लोकांनी "शिळं अन्न, अर्धवट शिजवलेलं चिकन किंवा मटण खाऊ नये" अशाही सूचना केल्या आहेत.

हॉस्पिटल

फोटो स्रोत,Getty Images

फोटो कॅप्शन,पुण्यात गीयन बारे सिंड्रोमच्या रुग्णांसाठी हॉस्पिटलमध्ये विशेष वार्ड स्थापन करण्यात येत आहेत

जगभरातील बहुतांश जणांना गीयन बारे सिंड्रोम आजार कमी शिजवलेल्या पोल्ट्री उत्पादनांमुळे होतो. त्याचबरोबर हा आजार पाणी, कॉलरा किंवा सालमोनेलासारख्या जिवाणू असलेल्या पाण्यामुळे पसरू शकतो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

रस्त्यावरील अन्नपदार्थ बनवण्यासाठी किंवा धुण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या दूषित पाण्यामुळे या जिवाणूचा प्रसार सहजरित्या होत्या. पुण्यात स्पष्टपणे, विशिष्ट रचना असलेला कॅम्पीलोबॅक्टर जिवाणूचा प्रसार होतो आहे. त्यामुळे त्याचा मोठ्या लोकसंख्येवर परिणाम होतो आहे.

मात्र अद्याप ही बाब स्पष्ट झालेली नाही की गीयन बारे सिंड्रोमचा प्रसार मोठ्या प्रमाणात दूषित पाण्याच्या पुरवठ्यामुळे झाला आहे की अनेकजण संक्रमित पोल्ट्री उत्पादनां खात असल्यामुळे झाला आहे.

"या आजारासंदर्भात लोकांनी घाबरू नये असं आवाहन आम्ही करत आहोत," असं आरोग्य विभागाच्या सूचनापत्रकात म्हटलं आहे. मात्र अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर याप्रकारची सूचना करणं सोपं आहे, मात्र प्रत्यक्षात तसं करणं कठीण आहे.

Post a Comment

Previous Post Next Post