मुस्लिम मुलींचे मुस्लिमेतर मुलां बरोबर वाढते विवाह : एक चिकित्सा
🪶 एम आय शेख
CELL -
घर को हमारे खूब सजाती हैं बेटियाँ जन्नत की हमको सैर कराती हैं बेटियाँ
सूरज की तरह बात मगर हम पे अयां है
बिगडी अगर तो खूब रूलाती हैं बेटियाँ
♦♦♦
▪इस्लामच्या कोंदनात बसवले गेले नाही तर बर्याच माणसाच्या प्रेमाचे रूपांतर प्रमेयामध्ये होउन जाते. अलिकडे मुस्लिम मुलींचे बिगर मुस्लिम मुलांबरोबर विवाह करण्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे व नेहमीप्रमाणे आपल्याला उशीरा जाग आलेली आहे. उर्दू प्रेस आणि समाजमाध्यमांमध्ये यावर उलट-सूलट प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. मागे मौलाना सज्जाद नोमानी यांची एक क्लिप समाजमाध्मांवर फिरत आहे ज्यात ते तब्बल आठ लाखांपेक्षा जास्त मुस्लिम मुलींनी आपला धर्म सोडून दुसऱ्या धर्मातील तरूणांबरोबर लग्नं केल्याचा दावा केला आहे. अर्थात या संबंधी काही सर्वे झाला असल्याचे किमान माझ्या वाचनात आलेले नाही. त्यांनी कुठल्या आधारावर हा दावा केला आहे हे समजत नाही. पण त्यांच्या सारख्या उंचीचा आलीम-ए-दीन जेव्हा एवढा मोठा दावा करतो तेव्हा समाजात घबराट पसरणे साहजिक आहे. त्याप्रमाणे घबराट पसरत देखील आहे. पण मला त्यांनी सांगितलेल्या आकड्यावर शंका आहे. या घबराटी दरम्यान आपले वस्तुनिष्ठ मत मांडावे हा सामाजिक बांधिलकीचा आग्रह आहे. म्हणून हा लेखनप्रपंच.
▪हे खरे आहे की, हा प्रश्न उग्र झालेला आहे. मात्र हे खरे नाही की, हा प्रश्न अचानक उद्भवलेला आहे. खरे पाहता याची बिजे गेल्या ७५ वर्षांपासून मुस्लिम समाजात रूजत आलेली आहेत. स्मार्टफोनच्या सहज उपलब्धतेमुळे आता त्याचे डेरेदार वृक्ष होतांना दिसत आहे, एवढेच.
▪झोपडपट्टीत राहणार्या अर्धशिक्षित मुलींपासून ते विद्यापीठात शिक्षण घेणार्या उच्चशिक्षित मुलींपर्यंत बर्याचजणींनी बिगर मुस्लिम तरूणांबरोबर विवाह केल्याचे मागच्या कांही वर्षाच्या स्पेशल मॅरेज रजिस्ट्रेशन आफिस मधून येणाऱ्या आकडेवारीवरून दिसून येते.
▪वास्तविक पाहता इस्लाम आज 21 व्या शतकातही तितकाच सार्थक आहे जितका तो सातव्या शतकात होता. मात्र बहुसंख्य भारतीय मुस्लिमांना या सार्थकतेचा विसर यासाठी पडला आहे की, आपल्यामध्ये कुरआन समजून वाचण्याची प्रथाच नाही. हे काम फक्त उलेमांचे आहे असा एक गैरसमज सर्वत्र पसरलेला आहे. याचा हा परिणाम आहे.
▪बिगर मुस्लिम वाचकांना हे वाचून नवल वाटेल की, कुरआन, जो की इस्लामचा पायाभूत ग्रंथ मानला जातो त्याला बहुसंख्य मुस्लिम केवळ वाचतात, त्याचा अर्थ त्यांना कळत नाही. पण दुर्दैवाने हे खरे आहे. संभवतः कुरआन हा जगातील एकमेव असा ग्रंथ आहे जो बहुसंख्य लोकांकडून फक्त वाचला जातो समजून घेतला जात नाही. समजत नसल्यामुळे त्यावर आचरण करण्याचा विचारही मनात येत नाही.
▪शुक्रवारच्या विशेष नमाजच्या पूर्वी दिल्या जाणार्या खुत्ब्या (विशेष भाषण) मध्ये काही वचनांवर चर्चा जरूर होते. परंतु, ती इतक्या औपचारिकपणे केली जाते की, अलिकडे कित्येक लोक ती चर्चा टाळून फक्त नमाज सुरू होण्यापूर्वी पाच मिनिट अगोदर मस्जिदीमध्ये जातात. म्हणून शुक्रवारच्या खुत्ब्याची परिणामकारकता ही हळू-हळू कमी होत चाललेली आहे.
▪सारांश बहुतेक मुस्लिमांचा कुरआनशी संबंध गेल्या अनेक दशकांपासून प्रत्यक्षात तुटलेला आहे. त्यातल्या त्यात मुस्लिम महिलांमध्ये कुरआन संबंधीची जाणीव फारच कमी आहे. हे मूळ कारण आहे ज्याचा परिणाम मुस्लिम मुलींचे बिगर मुस्लिम मुलांबरोबर विवाहाच्या रूपाने समोर येत आहे.
▪कुरआन समजून न घेतल्यामुळे त्यातील हराम (निषिद्ध) गोष्टी का हराम केल्या गेल्या व बाकी गोष्टी का हलाल ठेवल्या गेल्या? त्यामागे कोणते तत्वज्ञान आहे? याची जाणीवच सामान्य मुस्लिमांमध्ये निर्माण न झाल्याने त्यांच्या जीवनात अनेक बिगर इस्लामी प्रथा-परंपरा खोलपर्यंत रूजलेल्या आहेत. त्यात व्याजाधारित व्यवहार, दारू, तंबाखू, गुटखा, महागडे निकाह, वगैरे प्रामुख्याने सामिल आहेत. बिगर इस्लामी व्यक्ती बरोबर लग्नासाठी (मुलगा आणि मुलगी दोहों साठी) का मनाई केली गेलेली आहे याची जाणीव समाजा मध्ये नाही. एखाद्या मुस्लिम तरुणांने एखाद्या बिगर मुस्लिम तरुणी बरोबर लग्न केले तर हेच मुस्लीमान किती खुश होतात हे समाजमाध्यमांवर त्यांना मिळत असलेल्या शुभेच्छांच्या संख्ये वरून सहज लक्षात येते. वास्तविक पाहता हे लग्न जासत गंभीरपणे विचारात घेणे गरजेचे आहे. कारण एक मुलगी जर धर्माबाहेर जाऊन लग्न करत असेल तर धार्मिक दृष्टीने तिचे एकटीचे नुकसान आहे पण एखादी बिगर मुस्लिम तरुणी जर लग्न होऊन मुस्लिम कुटुंबात आली तर त्या कुटुंबातील इतर सदस्य तिच्या बिगर इस्लामी संस्काराने प्रभावित झाल्या शिवाय राहणार नाहीत. हे जास्त हानीकारक आहे. याची काळजी कोणालाही वाटत नाही.
▪व्याजाधारित कर्ज फिटत नसल्यामुळे काही कुटुंबातील मुली नाईलाजाने काम करण्यासाठी घराबाहेर पडतात. घरातील सुरक्षित वातावरणात लहानच्या मोठ्या झालेल्या या पर्दानशीन मुली घराबाहेर पडताच बाहेरील वातावरणामध्ये हुरळून जातात. तत्पूर्वी घरातील टी.व्ही.च्या माध्यमातून त्यांची ’जहेनसाजी’ (वैचारिक प्रशिक्षण) झालेलीच असते. एकंदरित टि.व्ही. मालिकांचा प्रभाव, त्यामुळे त्यांच्या स्वतःच्या भविष्याविषयीच्या सोनेरी कल्पना व घराबाहेर पडण्याचे स्वातंत्र्य याचा एकत्रित परिणाम असा होतो की त्यांच्यातील अनेकजणी चुकीच्या मार्गाला लागतात त्यातूनच कित्येक प्रकरणे बिगर मुस्लिमांबरोबर विवाह पर्यंत पोहोचतात.
▪मुस्लिम मुलींनीही उच्च शिक्षण घेऊन आपले करीअर करावे, असे मत असणार्या पुरोगामी मुस्लिम कुटुंबांची संख्या सुद्धा समाजामध्ये कमी नाही. आधुनिक शिक्षणाबरोबरच आधुनिक पोशाख परिधान करून आपल्या मुलींनी समाजात आत्मविश्वासाने वावरावे, यासाठी अनेक ’रौशन खयाल’ पालक स्वतः आपल्या मुलींना ’महेरम व परदा’ पद्धतीचा त्याग करण्यासाठी प्रोत्साहित करताना दिसतात. नव्हे अनेक उच्चभ्रू खानदानांमध्ये तर मुलींच्या मर्जीविरूद्ध त्यांना परदा पद्धतीचा त्याग करण्यासाठी बाध्य केले जाते. जे-जे पश्चिमेचे ते-ते पावन व पवित्र समजण्याची किंमत अशा पालकांना आपल्या मुलींचे विवाह बिगर मुस्लिम तरूणांबरोबर करून देऊन चुकवावी लागत आहे.
👉 मात्र लक्षात ठेवा मित्रानों...!
अल्लाह से करे दूर तो तालीम भी फ़ितना
इम्लाक भी जागीर भी औलाद भी फ़ितना
ना हक के लिए उठ्ठे तो शमशीर भी फ़ितना
शमशीर ही क्या नारा-ए-तक्बीर भी फ़ितना
▪साधारणतः मुस्लिम पुरूष काही अंशी तरी मस्जिदच्या संपर्कात येत असल्यामुळे त्यांना इस्लामी अहेकामात (ईश्वरीय आदेश) विषयी थोडीफार तरी कल्पना असते. परंतु, महिला व मुलींना मस्जिदीमध्ये येण्याची अघोषित बंदी भारतामध्ये अनेक शतकांपासून घातली गेलेली असल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम हा मुस्लिम मुलींच्या जडण-घडणीवर पडत आहे. त्यातूनच इतर मुलांबरोबर लग्न करण्यापर्यंत त्यांचे धाडस होत आहे. हे विवाह अशा मुलींच्या कुटुंबाचेच नव्हे तर संपूर्ण मुस्लिम समाजाचे सामुहिक अपयश आहे असे माझे स्पष्ट मत आहे.
▪मुस्लिम प्रेस, मुस्लिम पुरूष, मुस्लिम बुद्धीजीवी आणि उलेमा हे किमान भारतात तरी मुस्लिम महिलांची परिस्थिती बिकट करण्यामध्ये बरोबरीचे भागीदार आहेत. निकाह संबंधीच्या सर्व कुरीतींना आपल्या नालैन (बूट) च्या टाचेखाली तुडवून एक स्वच्छ, साधी व सुंदर निकाहची पद्धत प्रेषित मुहम्मद सल्ल. नी आपल्याला दिली होती. त्याची पुरती वाट लावण्यामध्ये आपल्या सर्वांचा वाटा आहे. विवाह अतिशय महाग व गुंतागुंतीचे करण्यामध्ये समाजाने कुठलीही कसर बाकी ठेवलेली नाही. प्रेषित सल्ल. नी म्हटले, ” निकाह को आसान करो” हमने उसे "मुश्किल" बना दिया. प्रेषित सल्ल. यांच्या आदेशाची केलेली ही उघड प्रताडना आहे. त्याचीच फळे आज आपण आपल्या मुलींच्या धर्मबहाय्य लग्नाच्या रूपाने चाखत आहोत.
▪प्रेषित सल्ल. यांनी विवाह करण्यासाठी जे मार्गदर्शन केले ते खालीलप्रमाणे. "विवाह चार गोष्टींकडे पाहून केला जातो.
1. खानदान
2. संपत्ती
3. रंगरूप
4. दीनदारी (धर्म पारायणता).
▪चौथै कारण लग्न करण्यासाठी सर्वोत्कृष्ट कारण आहे.”
(संदर्भ : बुखारी हदीस क्र. 4700)
▪या मार्गदर्शनाचा आम्हाला विसर पडलेला आहे. त्याचे परिणाम आपण भोगत आहोत. निकाहमध्ये अनेक बिगर इस्लामी खर्चिक प्रथांचा प्रवेश झालेला आहे. यातूनसुद्धा मुलींना बिगर मुस्लिम मुलांबरोबर विवाह करण्यासाठी प्रेरणा मिळत असल्यास नवल ते कोणते?
▪याशिवाय, तीन तलाकचा बराच दुरूपयोग झालेला असतांनाही समाजातील जबाबदार पुरूष घटक मूग गिळून गप्प बसले. ही बाबही काही मुलींना मुस्लिम मुलांबरोबर विवाह करण्यापासून परावृत्त करण्यास काही अंशाने तरी नक्कीच कारणीभूत आहे. कारण अनेक मुस्लिम मुलींनी धर्मबहाय्य लग्न केल्यानंतर प्रेस समोर बोलताना अशी प्रतिक्रिया दिलेली आहे की "अब में तीन तलाक का डर नही रहा." याचा अर्थ स्पष्ट आहे की नकळत का होईना त्यांच्या मनात तीन तलाक ची जबरदस्त भीति होती. आणि ही भीति अवाजवी नाही असे माझे स्पष्ट मत आहे. यातून काही मुली धर्मबहाय्य लग्न करीत असल्यास नवल ते कोणते.
▪अल्पशिक्षण, कायद्याविषयीचे अज्ञान, इस्लामविषयीची अनास्था, गरीबी, अस्वच्छता, कुटुंबावर पुरूषांचे अवाजवी वर्चस्व इत्यादी कारणांमुळे मुस्लिम महिला ह्या भरडून निघतांना आपल्या मुली ’याची देही याची डोळा’ पाहत आहेत. परिणामी, आधुनिक शिक्षण घेतलेल्या ह्या मुली चांगलें जिवन जगण्याच्या लालसेने या व्यवस्थेविरूद्ध बंड करून दुसर्या मुलांबरोबर विवाह करत असल्यास त्यांना दोष तरी कसा देणार?
▪महाविद्यालय व विद्यापीठातून शिकणार्या आधुनिक मुस्लिम मुली या त्यांच्या बिगर मुस्लिम श्रीमंत, संघटित, शक्तीशाली मुलांकडे आकर्षित झाल्यास नवल ते काय? व अशा मुलांकडून हॉटेल, मल्टिप्लेक्स, मॉल मधून मोफत भटकंतीची लागलेली चटक, त्यात महागडे फोन, परफ्युम, चॉकलेट्स, कपडे इत्यादी भेटवस्तूंचा भडिमार, या सर्व गोष्टींमुळे काही मुली नक्कीच भारावल्या जातात आणि कपड्यांमध्ये मॅचिंगसाठी दक्ष राहणार्या ह्या मुली जोडीदार निवडतांना मात्र मॅचिंगकडे साफ दुर्लक्ष करतात आणि चुकीचा जोडीदार निवडून आयुष्यभर पसतावतात.
▪स्पेशल मॅरेज अॅक्टखाली एकदा कोर्ट मॅरेज केल्यावर आपला परतीचा दोर कापला जातो, हे त्यांच्या लक्षातच येत नाही. काही मुली स्थिरावतात मात्र बहुतांशीचे वाटोळे होते. नवरा नीट नांदवत नाही व मुस्लिम समाज स्विकारत नाही, अशा विचित्र कोंडीत त्या अडकून पडतात. अलिकडे हैद्राबाद येथील एक बिगर मुस्लिम फौजदाराने त्याच्या मुस्लिम पत्नी व सासूला केलेल्या निर्दयी मारहाणीचा व्हिडीओ भलताच व्हायरल झाला होता. तो ज्यांनी पाहिला असेल त्यांना अशा विजोड लग्नामागच्या दाहकतेची जाणीव झाल्याशिवाय राहिली नसेल.
▪अॅन्ड्रॉईड फोनने तसे पाहता समाजातील सर्वच वर्गामध्ये हाहाकार माजवलेला आहे. विशेषतः या माध्यमातून येणार्या अश्लिल क्लिप्सनी तारूण्यात येण्यापूर्वीच मुलां-मुलींना मानसिकरित्या ’बालिग’ करून टाकलेले आहे. त्यात स्वस्त इंटरनेटने त्यांची भलतीच मदद केलेली आहे. त्यातून नको त्या वयात नको ते धाडस करण्यात सर्व समाजातील तरूण पिढी एव्हाना अभ्यस्त झालेली आहे. हे सुद्धा धर्मबाह्य विवाहाचे एक मोठे कारण आहे.
हो जाओ होशियार बिगड जानेसे पहले
थाम लो बेटिको निकल जानेसे पहले
दामनको उसके भर दो मुहम्मद (स.) की अता से
इस ’फाय जी’ डेटा में उलझ जाने से पहले
▪महिलांच्या बाबतीत कुरआनमध्ये स्पष्ट म्हटलेले आहे की,
1. आपल्या घरांत टिकून राहा आणि गत अज्ञानमूलक काळाप्रमाणे शृंगाराचे प्रदर्शन करत फिरू नका. नमाज कायम करा, जकात द्या, अल्लाह आणि त्याचे पैगंबर (सल्ल.) यांचे आज्ञापालन करा.
(संदर्भ : सुरे एहजाब आयत क्र. 33).
2. ”आणि आपल्या स्त्रियांचे विवाह अनेकेश्वरवादी पुरूषांशी करू नका. इथपर्यंत की ते श्रद्धा ठेवीत नाहीत” (संदर्भ : सुरे अलबकरा आयत नं. 221)
3. ” हे पैगंबर (सल्ल.)! त्यांना सांगा माझ्या विधात्याने निर्लज्जपणाच्या कामांना अवैध ठरविले आहे मग ते उघड असो का गुप्त. तसेच पाप आणि सत्याधिष्ठित नसलेली उल्लंघने आणि अल्लाहचे भागीदार ठरवणे ज्यांच्याविषयी अधिकृत (प्रमाण) अवतरलेले नाहीत. आणि अल्लाहविषयी असे काही बोलणे ज्याची तुम्हाला माहिती नाही.”
(सुरे अल्आराफ आयत नं. 33)
▪कुरआनच्या वरील आयातींचा सारांश पाहता मुस्लिम मुलींच्या बाबतीत एक मुलभूत प्रश्न असा उपस्थितीत करता येईल की, अशा विवाह करणार्या मुली शरई नैतिकतेच्या सुरक्षा कवचाबाहेर गेल्याच कशा? त्यांना एवढे स्वातंत्र्य मिळालेच कसे की एखाद्या गैरमहेरम मुस्लिम अगर बिगर मुस्लिमाबरोबर त्यांचा एवढा परिचय झाला की प्रकरण लग्नापर्यंत गेले? स्पष्ट आहे कारणं काहीही असोत घरातील सर्व सदस्यांनी कुरआन आणि सुन्नतच्या मर्यादा ओलांडण्याची आपल्या मुलींना मूक संमती दिली किंवा अक्षम्य दुर्लक्ष केलेले आहे.
- उपाय -
▪सर्व प्रथम मुलींचे मॅट्रिक पुढचे शिक्षण सह-शिक्षण पद्धतीने देने एकदम बंद करावे. हा उपाय काही लोकांना प्रतिगामी वाटण्याचा संभव आहे परंतु मुलींचे भविष्य वाचवायचे असेल तर हा उपाय केल्याशिवाय गत्यंतर नाही. लक्षात ठेवा मित्रांनो...! महात्मा गांधींनी एकदा म्हटलेलं होते की "आबकारी (दारू विकून) येणाऱ्या उत्पन्नातून शाळा उघडण्यापेक्षा मी आपल्या मुलांना निरक्षर ठेवणे पसंत करेन." ठीक याच पद्धतीने मुस्लिम मुली प्रसंगी उच्च शिक्षणापासून वंचित जरी राहत असतील तरी त्यांच्या स्वतःच्या रक्षणासाठी त्यांचे उच्च शिक्षण सहशिक्षणाच्या माध्यमातून बंद करावेच लागेल. कारण आज महाविद्यालय आणि विद्यापीठे शैक्षणिक कमी लव्हस्पाट जास्त झालेली आहेत. . महाविद्यालयीन शिक्षण जर आपल्या मुलींना धर्म आणि शीलभ्रष्ट करत असेल तर त्यांना असे शिक्षणच देण्यात येवू नये. त्यांना दारूल उलूम चे इस्लामी शिक्षण द्यावे ते त्यांच्या वैवाहिक जीवनात उपयोगी पडेल. त्यांचे उच्चशिक्षण थांबवावे किंवा समाजाने त्यांच्यासाठी उच्चशिक्षण देणार्या विशेष महाविद्यालयांची व्यवस्था करावी. नाही तरी उच्च शिक्षण घेतलेल्या मुली ह्या संसारासाठी उपयुक्त नसतात. तुम्ही सी.ए. केलेली मुलगी सून म्हणून आणाल आणि तिच्याकडून गृहकार्याची अपेक्षा कराल तर ते कधीही शक्य होणार नाही. लक्षात ठेवा मित्रांनो...! येत्या काही वर्षात घरेलू (गृहिणी बनू इच्छिणाऱ्या) मुलींची मागणी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. लवकरच उच्च शिक्षित सुनांचा अनुभव घेतल्यानंतर लोक परत गृहिणीसाठी मुलींचा शोध घेतील. त्यावेळेस कमी शिकलेल्या मात्र गृहकार्यदक्ष मुली या लग्नासाठी जास्त पात्र मानल्या जातील.
▪शक्य तिथे महिलांना मस्जिदीशी जोडण्याचा प्रयत्न करावा. परद्याचे पालन करून त्यांच्यासाठी मस्जिद परिसरामध्ये एखादी खोली निश्चित करावी. ज्या ठिकाणी त्यांनी येवून नमाज अदा करावी व दर्स (उपदेश) नियमितपणे ऐकावेत.
▪घराघरामध्ये कुरआन आणि हदीसच्या तालीमची व्यवस्था कुटुंबप्रमुखाने स्वतःच्या देखरेखीखाली करावी.
▪टी.व्ही. तात्काळ घरातून काढून काढावा. कारण आता हे उपकरण कालबाह्य झालेले आहे. यापासून नफा कमी नुकसान जास्त होत आहे. राहता राहिला जगाशी संपर्कात राहण्याचा प्रश्न तर तो स्मार्ट फोनच्या सहाय्याने सोडविणे सहज शक्य आहे.
▪परदा आणि महेरम पद्धतीचे सेल्फ ऑडिट (स्वलेखापरिक्षण) करून त्रुटी आढळून आल्यास त्या दूर कराव्यात.
▪एसआयओ आणि जीआयओसारख्या विद्यार्थी संघटनांना अधिक प्रभावी करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात याव्यात.
▪मुस्लिम मुलं असो का मुली त्यांना धर्मबहाय्य विवाहानंतर येणार्या अडचणी व त्यांच्या भयानक परिणामांसंबंधीची जाणीव जागृत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत.
▪ निकाहनंतरचे जेवण सक्तीने बंद पाडावेत. लग्न सोपे करावेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सर्व सुधारणा स्वतःपासून सुरू कराव्यात.
▪थोडक्यात अनेक मुस्लिम लोक असे आहेत की, ज्यांची विचारशक्ती पाश्चिमात्य प्रभावाखाली लकवाग्रस्त झालेली आहे. वरकरणी ते मुस्लिम दिसतात परंतु, विचार ते पाश्चात्यांसारखे करतात. हे वैचारिक दिवाळखोरीचे लक्षण आहे. यात सुधार करून शुद्ध इस्लामची उच्च वैचारिक पातळी गाठण्याची गरज आहे. हे केल्यास आपल्या मुली आपल्या डोळ्यासमोर पळून जाऊन लग्न करतांना पाहण्याची नामुष्की टाळताना येईल. हा असा प्रश्न नाही की ज्यावर कुठला उपाय नाही.
▪मुळात नाईलाज झाल्या शिवाय कांही करावयाचे नाही हा कांग्रेस प्रमाणे मुस्लिमांचाही स्थाईभाव आहे. असो वैचारिक शुद्धीकरणाने या प्रश्नावर सहज मात करता येईल. कारण की, जगाच्या इतिहासात असे अनेक दाखले आहेत की याप्रकारच्या आव्हानांना मुस्लिमांनी लिलया पेलले आहे.
क्या हुआ गर दो चार मौजे हमको छू गई,
हमने बदला है न जाने कितने तुफानों का रूख.
एक महत्त्वाचा प्रश्न
▪मग बिगर मुस्लिम मुलींचे मुस्लिम मुलांशी विवाहाचे काय?
उत्तर
▪हा मजकूर वाचून असा प्रश्न उपस्थित होणे साहजिक आहे की, जर इस्लाम सर्वांसाठी आहे, जगातील सर्व लोक एका आई-वडिलांची लेकरे आहेत अस विश्वबंधुत्वाचा विचार इस्लाम देतो तर आपल्या समाजातील मुली इतर मुलांबरोबर स्वमर्जीने लग्न करीत असल्यास मुस्लिमांना विरोध करण्याचे कारण काय?
▪याबाबतीत माजी सैद्धांतिक भूमिका अशी की, लग्नाअगोदर प्रेम इस्लामला मान्यच नाही. अलिकडे प्रेम महाविद्यालययीन जिवनात सूरु होते म्हणून शील महत्त्वाचे का शिक्षण हे ज्याचे त्याने ठरवावे. लग्नापूर्वी प्रेम करणे गैरइस्लामी व पापकृत्य आहे. त्यामुळे वरील प्रश्न हा अनाठायी ठरतो. वास्तविक पाहता मुस्लिम मुलींचे विवाह कोणत्याही तरूणाशी करण्यात इस्लामला कुठलीच हरकत नाही. मग तो मिचमिच्या डोळ्यांचा चिनी तरूण असो का आफ्रिका खंडाचा काळा तरूण असो. अट फक्त एकच आहे की, त्याला इस्लामचा विश्वबंधुत्वाचा विचार मान्य असावयास हवा. तो नसेल तर मुस्लिम मुलीलाच नाही तर बिगर मुस्लिम मुलालाही अशा विवाहापासून सुख मिळणार नाही. दोघांचे आचार, विचार आणि संस्कार परस्परविरोधी असल्यामुळे, ” मधुचंद्राचा” काळ लोटताच दोघांमधील विरोधाभास उघडा पडेल. लहान सहान गोष्टीवरून भांडणे होतील. अशा विजोड विवाहातून शेवटी मुलीचेच नुकसान होईल. जी बाब मुस्लिम मुलीची तीच बाब बिगर मुस्लिम मुलीची. मुस्लिम मुलाबरोबर लग्न झाल्यानंतर त्या लग्नाचीही बहार ओसरताच शेवटी नुकसान बिगर मुस्लिम मुलीचेच होईल. अशा विजोड विवाहित जोडप्यां पैकी अनेकांचा करुण अंत होतो हे लक्षात ठेवा.
▪शिवाय,आपल्या देशात अशा आंतरधर्मिय लग्नांमुळे अनेकवेळा, ”ऑनर कीलिंग”च्या घटना आणि कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. आपला हा इतिहास पाहता सर्व समाजातील लोकांनी आपापल्या मुलींना लग्नाची समज येण्याचे वय होताच स्वधर्मीय मुलाबरोबर लग्न करण्याची तिची मानसिक तयारी करवून घ्यावी व लग्नाचे वय झाल्यानंतर तात्काळ लग्न करून टाकावे. यातच सर्वसमाजाचे व पर्यायाने राष्ट्राचे हित निहित आहे. जय हिंद!