Header Ads

  • Breaking News

    label ताज्या बातम्या

    निवडणूक जाहीरनाम्याला करारनाम्याचे स्वरूप आले पाहिजे : डॉ. उदय निरगुडकर




     निवडणूक जाहीरनाम्याला  करारनाम्याचे 

    स्वरूप आले पाहिजे : डॉ. उदय निरगुडकर 
    लातूर :  कोणत्याही सार्वत्रिक निवडणुकीत राजकीय पक्ष जाहीरनामे प्रसिद्ध करतात. पण कोणताही पक्ष त्या जाहीरनाम्याच्या  पूर्तीसाठी प्रयत्न करताना दिसत नाही. मते मिळाली, निवडून आले की सगळे काही विसरून जातात. मतदारांनी, सुजाण नागरिकांनी आता अशा जाहीरनाम्यांना  करारनाम्याचे स्वरूप आणून संबंधितांना त्याचा जाब विचारायची वेळ येऊन ठेपलीय, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांनी  केले.  
    लातूर येथील पूर्णानंद सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजित केल्या    जाणाऱ्या  शारदोत्सव व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प बुधवारी, दि. २५ ऑक्टोबर रोजी  सायंकाळी  ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांनी '  भारत @ २०४७ ' या विषयावर गुंफले. आपल्या अभ्यासपूर्ण विवेचनाने  डॉ. निरगुडकर यांनी लातूरवासियांना अक्षरशः मंत्रमुग्ध करून टाकले. २०४७ साली भारत योग्य राजकीय नेता आणि योग्य राजकीय पक्षाच्या निवडीमुळे जगात सर्वश्रेष्ठ कसा ठरेल, याविषयी त्यांनी अत्यंत मुद्देसूद मार्गदर्शन केले.निवडणुका आल्या की मतदारांना दाखवली जाणारी प्रलोभने किती घातक प्रवृत्तींना जन्म देत असल्याचे सांगतानाच आजचा सुजाण, चाणाक्ष मतदार यापुढील काळात राजकीय पक्षांकडून काहीही मदत मिळाली तरी तो लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी भविष्याचा वेध घेऊनच मतदान करेल, असे चित्र दिसत असल्याचे सांगितले. मतदारांना फुकटच्या वस्तू, सामग्री देण्याची सवय लावण्याऐवजी बेरोजगारांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी राजकीय पक्षांनी पुढे येणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 
     आपण एखादा फ्लॅट, प्लॉट विकत घेताना जसा करारनामा करतो तसे निवडणूक जाहीरनाम्यात लिहिल्याप्रमाणे संबंधितांने कामे   नाही केल्यास ,  जाहीरनाम्याप्रमाणे न वागणाऱ्या संबंधितांना त्याचा जाब विचारून पुन्हा घरी बसविण्यासाठी मतदारांनी आता स्वतःहून पुढे येणार गरजेचे आहे. दरडोई उत्पन्नांत वाढ झाल्याशिवाय देश विकसित होऊ शकणार नाही. जनता आणि शासन यांच्यात सुसूत्रता येणे अत्यंत आवश्यक आहे. लोकशाही सुरक्षित राहिली तरच देशाची प्रगती गतिने होऊ शकते. आपल्या देशात आजघडीला सगळे वेगाने बदलत जात आहे. भारत आणि भारतीय लोक चमत्कार करू शकतात, हे मागच्या काळात कोरोनाने दाखवून दिले आहे. योग्यवेळी केलेले लॉकडाऊन आणि लसीकरणाने हे सिद्ध केली. केवळ आपल्या देशवासियांनाच नव्हे तर तब्बल १०० देशांना भारताने  मोफत लसी पुरविल्या. त्याचे पेटंट न करता जगातील लोकांचा जीव वाचविण्यास प्राधान्य देण्याचे काम केंद्र सरकारने केले. भारतातील लोकांकडे प्रचंड ज्ञानलालसा, जिज्ञासा आहे. एखादी गोष्ट मनात घेतली की ती पूर्णत्वास नेण्याची क्षमता आपल्या लोकात आहे. आयटी याचा नवा अर्थ इन्कम टॅक्स असा नाही तर इंडियाज टुमारो ' उद्याचा भारत असा लावला गेला पाहिजे, असे डॉ. निरगुडकर यांनी नमूद करून २०४७ सालचा भारत एक समर्थ, सक्षम भारत असेल असे सांगितले. 
    पूर्णानंद सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या शारदोत्सव व्याख्यानमालेचे हे २३ वे वर्ष आहे. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात संस्थापक अध्यक्ष अशोक गोविंदपूरकर यांनी या व्याख्याननमालेच्या माध्यमातून लातूरकरांना प्रतिवर्षी उत्तमोत्तम वक्त्यांच्या व्याख्यानांची बौद्धिक मेजवानी उपलब्ध करून दिली जा त असल्याचे सांगितले. मंचावर प्रायोजक प्रतिनिधी माजी आमदार वैजनाथ शिंदे, लातूर क्रेडिट सोसायटीचे प्रा. इसरार  सगरे, जिल्हा बँकेचे पवार,  व्याख्यानमालेचे अध्यक्ष अरुण समुद्रे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व  आभार प्रदर्शन अब्दुल गालिब शेख यांनी केले. 

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad