१ सप्टेंबरपासून लातूर जिल्ह्यात हेल्मेट वापर अनिवार्य. टप्प्याटप्प्याने होणार अमलबजावणी .

www.latursaptrangnews.com
By -
0



 १ सप्टेंबरपासून लातूर जिल्ह्यात हेल्मेट वापर अनिवार्य.  टप्प्याटप्प्याने होणार अमलबजावणी .


 विना हेल्मेट गाडी चालवल्यास मोटार वाहन कायदा कलम 129 /194(D) नुसार कार्यवाही केली जाणार. 1000/- दंडाची तरतूद 



                दिवसेंदिवस वाढणारी वाहनांची संख्या, वाढती वाहतूक आणि वाहतूक नियमांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे रस्ते अपघातांचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढत आहे. विशेषतः दुचाकी अपघातांमध्ये हेल्मेटचा वापर न करणाऱ्या वाहनचालकांना गंभीर दुखापत होऊन जीव गमावण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे हेल्मेट हा केवळ वाहतूक नियम नसून जीवन वाचविणारे सुरक्षा कवच आहे, हे लक्षात घेऊन लातूर जिल्ह्यात १ सप्टेंबर २०२६ पासून दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट वापर अनिवार्य करण्यात येत आहे.

 या निर्णयाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात येणार आहे.


पहिला टप्पा : राष्ट्रीय महामार्ग तसेच राज्य मार्ग .

                  १ सप्टेंबरपासून प्रथम राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग तसेच जिल्ह्यातील प्रमुख वाहतूक मार्गांवर हेल्मेट वापराच्या नियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या मार्गांवर मोठ्या प्रमाणावर दुचाकी वाहतूक होत असल्याने अपघाताचा धोका लक्षात घेऊन सुरुवातीला या मार्गांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.


दुसरा टप्पा : जिल्हा अंतर्गत सर्व ग्रामीण मार्ग.

                त्यानंतर लातूर जिल्हा अंतर्गत सर्व ग्रामीण मार्गावर. याही मार्गावर प्रामुख्याने दुचाकीवर वाहतूक करणाऱ्या लोकांचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आलेले आहे. अपघाताचे प्रमाण सुद्धा जास्त असल्याचे निदर्शनास आलेले आहे.त्यामुळे या सुद्धा मार्गावर प्रवास करणाऱ्या सर्वांनी हेल्मेट वापरणे अनिवार्य  असल्यामुळे हेल्मेट वापरा संबंधाने याही मार्गावर कारवाया करण्यात येणार आहेत. 


तिसरा टप्पा : लातूर महानगरपालिकेतील प्रमुख रस्ते व शहरातील महत्त्वाच्या वाहतूक मार्गावर

                यानंतर महानगरपालिकेतील प्रमुख रस्ते व शहरातील महत्त्वाच्या मार्गावर हेल्मेट अंमलबजावणी संबंधाने विशेष लक्ष देऊन कार्यवाही करण्यात येणार आहेत. एकंदर सर्व जिल्ह्यातील नागरिक हे नियमितपणे जोपर्यंत हेल्मेट वापरणार नाहीत तोपर्यंत हेल्मेट संबंधाने दंडात्मक कार्यवाही ही सुरूच राहणार आहे.

 अशाप्रकारे संपूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये हेल्मेट वापराची सुरक्षित संस्कृती निर्माण करण्याचा लातूर पोलिसांचा प्रयत्न असणार आहे.

Post a Comment

0 Comments

Post a Comment (0)
3/related/default