गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पोलिसांची कारवाई, 12 लाखांचे डीजे साहित्य जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा
चंद्रपुरात गणेशोत्सवाच्या प्रारंभीच पोलिसांची धडक कारवाई पाहायला मिळाली. येथील राजुरा शहरात विनापरवाना डीजे वाजवल्याप्रकरणी 12 लाख 60 हजारांच्या मुद्देमालासह संपूर्ण डीजे साहित्य जप्त
चंद्रपूर : यंदाच्या गणेशोत्सवापूर्वी नो डिजे, नो डॉल्बी (DJ) चळवळ पाहायला मिळाली. पुण्यातील विद्यानंद बापट यांनी सार्वजनिक गणेशोत्सवातील डीजे आणि ध्वनीप्रदुषणाला विरोध करत सर्वांचे लक्ष वेधले. त्यानतंर, पुण्यासह विविध जिल्ह्यात नो डीजे, नो डॉल्बीचे आदेश जारी करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाचा दाखला देत, गणेशोत्सव पारंपरिक आणि सांस्कृतिक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन पोलीस आणि प्रशासनाकडून करण्यात आले. त्याच, पार्श्वभूमीवर नागपूर, पुणे पोलिसांनी (police) डीजेंवर कारवाई करण्यासही सुरुवात केली आहे. त्यातच, गणपती बाप्पांच्या आगमनाच्या पहिल्याच दिवशी चंद्रपुरात (Chandrapur) पोलिसांनी डिजे वाजवणाऱ्यांवर कारवाई करत साहित्य जप्त केले.
चंद्रपुरात गणेशोत्सवाच्या प्रारंभीच पोलिसांची धडक कारवाई पाहायला मिळाली. येथील राजुरा शहरात विनापरवाना डीजे वाजवल्याप्रकरणी 12 लाख 60 हजारांच्या मुद्देमालासह संपूर्ण डीजे साहित्य जप्त करत 2 जणांविरोधात गुन्हा देखील दाखल केला करण्यात आला. गणेशोत्सवाच्या प्रारंभीच पोलिसांनी डीजे विरोधात धडक कारवाईला प्रारंभ केला आहे. राजुरा शहरात नव्या बस स्थानकापुढे एका बोलेरो पिकअपमध्ये कर्कश्य आवाजात डीजे वाजत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, घटनास्थळी जात डीजे बाबत परवाना विचारला असता तो आढळून आला नाही. त्यामुळे पोलिसांनी संपूर्ण डीजे साहित्य जप्त केले असून रवी एकवणकर आणि सचिन सरोज या दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करत,12 लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान, उत्सवात आगामी काळात कायद्याचे उल्लंघन कराल तर अशीच कारवाई केली जाईल अशा इशारा देखील पोलिसांनी दिला आहे.
दरम्यान, बहुतांश जिल्ह्यात नो डिजे, नो डॉल्बी असे आवाहन करत प्रशासानाने नागरिकांना उत्सव साजरा करण्याचे सूचवले आहे. आगमन आणि विसर्जन मिरवणुकीतही गणेशोत्सव हा पारंपरिक वाद्य आणि ढोला ताशांच्या गजरात, ध्वनी प्रदुषण नियमांचे पालन करुनच साजरा केला जावा, असेही पोलीस प्रशासनाने म्हटले आहे.