Header Ads

  • Breaking News

    label ताज्या बातम्या

    शिवसेना नावासह धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला!

     


    शिवसेना नावासह धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला!


    मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेला पक्षचिन्हाचा वाद निवडणूक आयोगाने निकाली काढला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला धनुष्यबाण चिन्ह देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतलेला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसलेला आहे. धनुष्यबाण चिन्ह आपल्याला मिळावं यासाठी दोन्हीही गट गेली दोन महिने कागदोपत्री पुरावे सादर करण्यात व्यस्त होते. तीच कागदपत्रं पाहून निवडणूक आयोगानं शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह सुपूर्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पुढच्या दोन ते तीन महिन्यांत राज्यात महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्या अगोदर शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानं मोठा दिलासा मिळाला आहे. पक्षचिन्हासोबतच शिवसेना नावदेखील एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळाले आहे. यापूर्वी निवडणूक आयोगानं हंगामी निर्णय देताना दोन्ही गटांना वेगवेगळे चिन्ह दिले होते. तसेच दोन्हीपैकी एकाही गटाला शिवसेना हे नाव दिले नव्हते. शिंदे यांच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव तर ठाकरेंच्या गटाला शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव दिले होते. मात्र अंतिम निर्णय देताना निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या पारड्यात आपला निर्णय टाकून त्यांना शिवसेना हे नाव दिले आहे.

    शिंदेंना धनुष्यबाण म्हणजे वारेमाप खोक्यांचा वापर : संजय राऊत

    ज्या पद्धतीने खोक्यांचा वारेमाप वापर झाला. तोच खोक्यांचा वापर लक्षात घेता हा तोच विजय आहे. खोक्यांचा वापर कुठपर्यंत झाला हे आता स्पष्ट झालं आहे. हा खोक्यांचा विजय आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

    निवडणूक आयोगाचा निर्णय धक्कादायक : सुप्रिया सुळे

    कुणावर विश्वास ठेवायचा हे कळत नाहीये. निवडणूक आयोग हे खूप पारदर्शक आहे. हा निर्णय मला कळतच नाहीये. हा निर्णय कसा झाला. या शिवसेनेची स्थापना बाळासाहेबांनी केली. बाळासाहेब हयात असताना त्यांनी ठरवलं होतं की, बाळासाहेबांनंतर शिवसेना ही उद्धव ठाकरे बघतील, पण हा निर्णय धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad