विवेकानंद रुग्णालय आजही सुसंस्कारीत स्वास्थ्य सेवेचे केंद्र आहे : डॉ. अशोकराव कुकडे
विवेकानंद रुग्णालय आजही सुसंस्कारीत स्वास्थ्य
सेवेचे केंद्र आहे : डॉ. अशोकराव कुकडे
लातूर : विवेकानंद रुग्णालय हे आजही सुसंस्कारीत स्वास्थ्य सेवेचे केंद्र आहे, हे संस्काराचे फलित असल्याचे प्रतिपादन विवेकानंद रुग्णालयाचे संस्थापक पद्मभूषण डॉ.अशोकराव कुकडे काका यांनी केले. मातोश्री वृद्धाश्रम परिसरात झालेल्या या कार्यक्रमात ' विवेकानंद वार्ता ' या त्रैमासिकाच्या विशेषांकाचे विमोचनही करण्यात आले.
विवेकानंद रुग्णालयाचे संस्थापक विश्वस्त डॉ. महेश मोरेश्वर देवधर यांचा अमृत महोत्सव नुकताच पद्मभूषण डॉ. कुकडे काका, पुण्याचे माजी खासदार प्रदीप रावत, ज्येष्ठ विधिज्ञ शरदराव चंद्रचूड आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच मातोश्री वृध्दाश्रम येथे साजरा करण्यात आला. डॉ.देवधर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मातोश्री वृद्धाश्रम परिसरातील नवीन इमारतीतील ' श्रीराम सभागृह' चे उद्घाटनही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. आपल्या मार्गदर्शनात डॉ. कुकडे म्हणाले की, डॉ. महेश देवधर यांचे सेवेसाठी समर्पित असलेले जीवन भावी पिढीसाठी निश्चितच पथदर्शक व मोलाचे शिक्षण देणारे आहे. सेवा करताना स्थळ, वेळ, आकारमान यापेक्षा तुमच्या भावना सर्वाधिक महत्वाच्या असतात, असेही डॉ. कुकडे म्हणाले. शरदराव चंद्रचूड यांनी आपले मनोगत व्यक्त करताना १९७५- ७६ च्या काळात लातूरसारख्या दुर्गम भागात वैद्यकीय सेवा देण्याचा डॉ. महेश देवधर यांचा निर्णय भावूक असू शकतो. पण आयुष्यभर समर्पित निष्काम सेवा देण्याचे दुर्मिळ काम त्यांनी केले, ही बाब सर्वांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.
माजी खासदार प्रदीप रावत यांनी यावेळी बोलताना डॉ. कुकडे काकांसारखा दीपस्तंभ, डॉ. देवधरांसारखा जीवनव्रती यांचा समर्पित सेवाभाव, तत्वनिष्ठा , प्रामाणिकता या सर्वांचे मूळ संघ संस्कारात असल्याचे सांगितले. आजचा प्रगतीशीलपुरोगामी हिंदू समाज हा प्रबोधन युगाची देणगी आहे. समाजात हिमालयाएवढ्या उंचीची माणसे शतकातून कधीतरी जन्माला येतात. पण त्यांच्या जीवावर समाज वर्धिष्णू होत नाही. त्याकरिता सामान्य माणसांचे सशक्तीकरण करावेच लागते. सर्वसामान्य माणसात असामान्य कार्य करण्याची शक्ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघ निर्माण करते याचा त्यांनी विशेष उल्लेख केला.
डॉ. देवधर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आपल्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून झालेल्या सेवेच्या संस्कारामुळे आपण आयुष्यभर हे कार्य अत्यंत निष्ठापूर्वक करू शकलो, असे सांगितले. अशाच प्रकारचे संस्कार पुढील पिढ्यांवरही व्हावेत अशी भावना त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. अरुणा देवधर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

No comments