Header Ads

  • Breaking News

    label ताज्या बातम्या

    मान्सून लवकरच महाराष्ट्रात येणार, यंदा पावसाळा कसा असेल? तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं

     अरबी समुद्राकडून भारतीय द्वीपकल्पाकडे वाहणारे वारे

    मान्सून लवकरच महाराष्ट्रात येणार, यंदा पावसाळा कसा असेल? तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं


    नैऋत्य मोसमी वारे आता महाराष्ट्राच्या अगदी वेशीवर पोहोचले आहेत आणि पुढच्या तीन चार दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल अशी अपेक्षा आहे.

    मान्सूननं 4 जून रोजी गोवा राज्य पूर्णपणे व्यापलं असून, मध्य अरबी समुद्र,रायलसीमाचा उर्वरीत भाग, कर्नाटक आणि तेलंगणातील आणखी काही भागातही आगेकूच केली आहे. वेळेच्या एक दिवस आधीच मान्सून गोव्यात दाखल झाला आहे.

    येत्या काही दिवसांत महाराष्ट्राच्या दक्षिण भागात तसंच तेलंगणा, कोस्टल आंध्र, छत्तीसगड आणि दक्षिण ओडिसाच्या काही भागांत मोसमी वाऱ्यांचं आगमन होणं अपेक्षित आहे.

    पुढच्या दोन दिवसांत कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी गडगडाट वादळी वारे आणि विजांसह पावसाच्या मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळतील आणि सात जूननंतर इथे पावसाचं प्रमाण वाढेल असं हवामान विभागानं म्हटलं आहे.

    IMD

    फोटो स्रोत,IMD

    रेमल चक्रीवादळामुळे यंदा बंगालच्या उपसागरातील मान्सूनची शाखा थोडी वेगानं वर सरकली. त्यानंतर 30 मे रोजीच मान्सून केरळ आणि ईशान्येकडील राज्यांत दाखल झाल्याचं हवामान विभागानं जाहीर केलं होतं.

    केरळमध्ये एरवी साधारण 1 जूनच्या आसपास मान्सून दाखल होतो, यंदा तो दोन दिवस लवकर इथे दाखल झाला.

    मान्सून यंदा सुरुवातीला थोडा वेगानं वाटचाल करत असला तरी जूनच्या मध्यापर्यंत मान्सूनचा पुढे सरकण्याचा वेग कमी होऊ शकतो असा अंदाज काही तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

    साधारणपणे जूनच्या मध्यापर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल अशी अपेक्षा आहे. जूनमध्ये राज्यात बहुतांश ठिकाणी सरासरीएवढाच पाऊस पडेल असं हवामान विभागाचं भाकीत आहे.

    मान्सून हा शब्द कुठून आला?

    काही भाषातज्ज्ञांच्या मते, मान्सून या शब्दाचं मूळ अरबी भाषेतल्या मौसीम या शब्दात आहे. मौसीम म्हणजे मोसमी वारे किंवा ऋतूनुसार वाहणारे वारे.

    दक्षिण आशियात ठराविक काळात मोसमी वाऱ्यांमुळे पाऊस पडतो. इतका की त्या काळाला पावसाळ्याचा ऋतू म्हणून इथे स्वतंत्र ओळख मिळाली आहे.

    याच मोसमी वाऱ्यांसाठी मान्सून हा शब्द ब्रिटिशकालीन भारतात वापरला जाऊ लागला.

    मान्सूनचे दोन प्रकार कोणते?

    भारतात जून ते सप्टेंबर या काळात वारे नैऋत्य दिशेकडून म्हणजे साधारण अरबी समुद्राकडून हिमालयाकडे वाहतात. या वाऱ्यांना नैऋत्य मोसमी वारे किंवा नैऋत्य मान्सून (साऊथ-वेस्ट मान्सून) म्हणून ओळखतात.

    तर ऑक्टोबर महिन्यात वारे याच्या उलट दिशेने म्हणजे ईशान्येकडून वाहतात. त्यांना ईशान्य मोसमी वारे किंवा ईशान्य मान्सून (नॉर्थ वेस्ट मान्सून) म्हणतात. या वाऱ्यांमुळे ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात प्रामुख्यानं दक्षिण भारतात पाऊस पडतो.

    माळशेज घाटात जमलेलेे मान्सूनचे ढग

    फोटो स्रोत,GETTY IMAGES

    फोटो कॅप्शन,माळशेज घाटात जमलेलेे मान्सूनचे ढग

    मान्सून कुठे तयार होतो?

    मान्सूनची निर्मिती कशामुळे होते, याविषयी काही सिद्धांत आहेत.

    पृथ्वी 21 अंशांमध्ये कलली आहे. त्यामुळे तिचा उत्तर गोलार्ध सूर्याच्या दिशेला असतो. परिणामी उत्तर गोलार्धात उन्हाळा असतो, तेव्हा दक्षिण गोलार्धात थंडी असते.

    जास्त तापमान असतं तिथे हवेचा दाब कमी तर कमी तापमानाच्या ठिकाणी हवेचा दाब जास्त असतो. वारे नेहमी जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहतात.

    जमिनीपेक्षा समुद्राचं तापमान थोडं थंड असतं, त्यावेळी समुद्राकडून वारे वाहू लागतात. येताना हे वारे समुद्रावरचं बाष्प आणतात, त्यातून पाऊस पडतो.

    पण हे असं चित्र पृथ्वीच्या इतर अनेक ठिकाणी होतं. मात्र भारतीय उपखंडातली स्थिती थोडी खास बनवते.


    फोटो स्रोत,BBC WEATHER

    फोटो कॅप्शन,अरबी समुद्राकडून भारतीय द्वीपकल्पाकडे वाहणारे वारे

    भारतीय द्वीपकल्पाचा आकार मोठा असून ऊन्हाळ्याच्या दिवसांत इथलं तापमान वेगानं खूप वाढतं आणि जमीनही तापते. विशेषतः मे महिन्या पर्यंत राजस्थानच्या वाळवंटात उष्णता वाढते. त्याच वेळी अरबी समुद्राच्या आसपासच्या प्रदेशात म्हणजे आफ्रिका, सौदी अरेबियन द्वीपकल्प यांचं तापमानही वाढतं.

    परिणामी हिंदी महासागरातून उत्तर गोलार्धात आलेले वारे भारतीय द्वीपकल्पाकडे वाहू लागतात. या वाऱ्यांसोबत मोठ्या प्रमाणात बाष्पही येतं. त्यातून ढगांची निर्मिती होते आणि पाऊस पडतो.

    ऑक्टोबर उजाडेपर्यंत तापमान आणि वाऱ्यांच्या दिशेचं गणित बदलतं, वारे ईशान्येकडून वाहू लागतात.

    मान्सूनमुळे किती पाऊस पडतो?

    भारतात साधारण 80 टक्के पाऊस हा नैऋत्य मान्सूनमुळे पडतो तर साधारण 11% पाऊस ईशान्य मान्सूनमुळे पडतो असं हवामान खात्याच्या नोंदी सांगतात.

    भारतात जून ते सप्टेंबर या काळात सरासरी 87 सेंटीमीटर एवढा पाऊस पडतो.

    मान्सून ऑनसेट म्हणजे काय?

    फक्त पाऊस आला, म्हणजे मान्सूनची सुरुवात झाली, असं नसतं. तर एखाद्या ठिकाणी विशिष्ठ कालावधीतील पावसाचं प्रमाण, वाऱ्याचा वेग आणि तापमानाची स्थिती पाहून हवामान विभागाचे तज्ज्ञ त्या ठिकाणी मान्सून ऑनसेट झाल्याचं म्हणजे मान्सूनची सुरूवात झाल्याचं जाहीर करतात.

    केरळ आणि लक्षद्वीपमधल्या 14 ठराविक हवामान केंद्रांपैकी किमान 60 टक्के म्हणजे 9 केंद्रांवर ठिकाणी 10 मे नंतर कधीही सलग दोन दिवस 2.5 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली, तर तिथे मान्सून दाखल झाल्याचं हवामान विभाग जाहीर करतो.

    साधारणपणे केरळमध्ये 1 जूनच्या आसपास मान्सून दाखल होतो. तिथून 7 ते 10 जूनपर्यंत मुंबईत आणि 15 जुलैपर्यंत संपूर्ण भारतात पसरतो.

    नैऋत्य मान्सूनच्या दोन शाखा आहेत – एक अरबी समुद्रातली आणि दुसरी बंगालच्या उपसागरातली.

    तर ईशान्य मान्सून साधारण 20 ऑक्टोबरच्या आसपास सक्रीय होतो.

    मान्सून का महत्त्वाचा

    जून- सप्टेंबर या मान्सूनच्या काळात साधारणपणे वर्षभरातील 70 टक्के पाऊस पडतो. यामुळे शेतीसोबतच, नद्या, धरणं, तलाव, विहरी भरण्यासाठी मान्सून महत्त्वाचा ठरतो.

    पाऊस

    फोटो स्रोत,GETTY IMAGES

    फोटो कॅप्शन,भारतातली शेेती मान्सूवरच अवलंबून आहे.

    मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसामुळे तीव्र उष्णतेपासून सुटका होते. पण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनंही मान्सून महत्त्वाचा आहे. दक्षिण आशियातल्या अर्थव्यवस्था त्यावर अवलंबून आहेत.

    भारतासारख्या शेतीप्रधान देशात आजही अनेक गणितं पावसावर अवलंबून असतात. एका रिपोर्टनुसार भारतातील जवळपास अर्धी शेती ही मान्सूनवरच्या पावसावर अवलंबून आहे.

    भारताच्या कृषी अर्थव्यवस्थेसाठी मान्सून ही लाइफलाईन मानली जाते. कमी किंवा जास्त पावसानं शेतीचं नुकसान होतं.

    1925 मध्येे ब्रिटनच्या रॉयल कममिशन ऑन अॅग्रिल्चर इन इंडियानं एका अहवालात भारतीय अर्थव्यवस्था म्हणजेे मान्सूनचा जुगार असल्याचं म्हटलं होतं. शंभर वर्षांनंतरही परिस्थिती बदललेली नाही.

    एल निनो, ला निना आणि मान्सून

    एल-निनो आणि ला-निना ही पॅसिफिक महासागरातल्या सागरी प्रवाहांच्या विशिष्ट स्थितींची नावं आहेत.

    पॅसिफिक महासागरात दक्षिण अमेरिकेच्या आसपास पाण्याचे तापमान जेव्हा नेहमीपेक्षा वाढते आणि ते गरम पाणी पश्चिमेला आशियाकडे सरकते, तेव्हा त्या स्थितीला ‘एल-निनो’ असं संबोधलं जातं. ला निना ही त्याउलट स्थिती आहे.

    या एल निनो आणि ला निना प्रवाहांचा जगभरातल्या हवामानावर आणि भारतातल्या मान्सूनवरही परिणाम होताना दिसतो. साधारणपणे भारतात एल निनोच्या काळात कमी तर ला निनाच्या काळात जास्त पाऊस पडताना दिसतो.

    एल निनो

    पण फक्त एकट्या एल निनोमुळे मान्सूनवर परिणाम होत नाही. तर एल निनोसारखाच हिंदी महासागरात इंडियन ओशन डायपोल अर्थात IOD हा प्रवाहही महत्त्वाचा ठरतो.

    IOD सकारात्मक असतो, म्हणजे पश्चिम हिंदी महासागराचं तापमान पूर्वेपेक्षा जास्त असतं, तेव्हा ती स्थिती भारतात मान्सूनला पोषक ठरताना दिसते.

    त्याशिवाय जेट स्ट्रीम या वातावरणाच्या वरच्या थरातील हवेच्या प्रवाहाचाही मान्सूनवर परिणाम होतो.

    यंदा मान्सून कसा असेल?

    तीन वर्ष दडी मारल्यावर एल निनो 2023 मध्ये पुन्हा प्रकटला आणि तेव्हापासून जगभरात अनेक ठिकाणी तापमानानं उच्चांक गाठले. पण एल निनो आता मागे हटत असल्याचं जागतिक हवामान संघटनेच्या तज्ज्ञांनी जाहीर केलं आहे.

    भारतीय हवामान विभागानंही त्याला दुजोरा दिला आहे. एल निनो सध्या मध्यम स्वरुपात असून, तो येत्या काळात कमकवूत होत जाईल आणि मान्सूनच्या मध्यावर ला निना चा प्रभाव जाणवू लागेल, अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे.

    तसंच सध्या IOD सम स्थितीत (न्यूट्रल) असून मान्सून सुरू झाल्यावर तो सकारात्मक होईल असं हवामान विभागानं म्हटलं आहे.

    या दोन्ही गोष्टी मान्सूनसाठी पोषक असून यंदा एकूण पाऊस सरासरीपेक्षा जास्त ठरेल असंही हवामान विभागाचं भाकित आहे.

    2024 मध्ये देेशभरात मान्सून असा असेल. हवामान विभागाचं भाकित.

    फोटो स्रोत,IMD

    फोटो कॅप्शन,2024 मध्ये देेशभरात मान्सून असा असेल. हवामान विभागाचं भाकित.

    भारतीय हवामान विभागाचे प्रमुख डॉ. मृत्युंजय महापात्र यांनी दिलेल्या माहितीनुसार देशभरात सरासरीपेक्षा जास्त म्हणजे 106 टक्के इतका पाऊस पडण्याची शक्यता आहे. जून ते सप्टेंबर या दरम्यानच्या नैऋत्य मान्सून काळातील पावसाचा हा अंदाज आहे.

    हवामान खात्याच्या अंदाजाच्या अचूकतेबाबत बोलताना, वर्तवलेल्या अंदाजापेक्षा 5 टक्के कमी किंवा जास्त प्रमाणात पाऊस होऊ शकतो, असंही ते म्हणाले. तसं असलं तरी सरासरीपेक्षा पावसाचं प्रमाण जास्तच राहील.

    मात्र जून महिन्यात थोडा कमी म्हणजे सरासरीएवढाच पाऊस पडेल, आणि मोसमाच्या दुसऱ्या टप्प्यात जास्त पाऊस अपेक्षित आहे असंही हवामान शास्त्रज्ञ सांगतात.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad