कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत बड्या नेत्यांच्या नातेवाईकांसाठी फिल्डिंग, कोणाला मिळणार तिकीट?



 Municiple Election 2026 : कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत बड्या नेत्यांच्या नातेवाईकांसाठी फिल्डिंग, कोणाला मिळणार तिकीट?


मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने 29 महानगर पालिकांसाठी निवडणूक जाहीर करताच प्रत्येक पक्षाने कंबर कसली आहे. नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या निकालानंतर आता महानगरपालिकांसाठी अनेक वेगवेगळी समीकरणे पाहायला मिळत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणून ओळखली जाते. पण, या निवडणुकीत राजकीय नेत्यांकडून आपल्या नातेवाईकांसाठी फिल्डिंग लावली जात आहे. आपल्या मुला-मुलींना आणि जवळच्या नातेवाईकांना या निवडणुकीमध्ये तिकीट मिळावे यासाठी अनेक बडे नेते आग्रही असल्याचे समोर आले आहे. पण, यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.


भाजप

भाजपच्या अनेक नेत्यांनी घराणेशाहीला सातत्याने विरोध केला आहे. पण याच भाजपमधील काही नेते आपल्या मुलांसाठी आणि नातेवाईकांसाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, खासदार भागवत कराड यांनी हर्षवर्धन आणि बहिण उज्वला दहिफळे यांच्यासाठी उमेदवारी मागितली आहे. तसेच, आमदार नारायण कुचे यांनी पत्नी शीतल यांच्यासाठी उमेदवारी मागितली आहे. तर, आमदार संजय केनेकर यांनी त्यांचा मुलगा हर्षवर्धन यांच्यासाठी उमेदवारी मागितली आहे. गुजरातचे मंत्री सी. आर. पाटील हे मुलगी धर्मिष्ठा चव्हाण यांच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत. खासदार धनंजय महाडिक यांचे पुत्र कृष्णराज महाडिक यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. महेश लांडगे हे भावासाठी, उमा खापरे या मुलासाठी तर अमित गोरखे हे आईच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत.

एकनाथ शिंदेंची शिवसेना

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील अनेक नेते हे आपल्या घरातच कोणाला ना कोणाला उमेदवारी मिळावी, यासाठी आग्रही असल्याचे दिसून येत आहे. मंत्री संजय सिरसाट हे आपला मुलगा सिद्धांत आणि मुलगी हर्षदा यांना उमेदवारी मिळावी यासाठी आग्रही आहेत. तर, आमदार आमदार प्रदीप जैस्वाल यांनी मुलगा ऋषिकेशसाठी उमेदवारी मागितली आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार किशनचंद तणवाणी यांनी आपला मुलगा तसेच भावासाठी उमेदवारी मागितली. तर, माजी महापौर नंदू घोडेले यांनी स्वतःसाठी तसेच पत्नीसाठी उमेदवारी मागितली आहे. तर माजी महापौर विकास जैन यांनी स्वतःसाठी तसेच पत्नीसाठी उमेदवारी मागितली आहे. तसेच, आमदार राजेश क्षीरसागर यांचे पुत्र ऋतुराज क्षीरसागर आणि शिवसेनेच्या माजी आमदार जयश्री जाधव यांचे पुत्र सत्यजित जाधव हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे.

उद्धव ठाकरेंची शिवसेना

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी आपला भाऊ राजेंद्र दानवे यांच्यासाठी उमेदवारी मागितली असल्याचे समोर आले आहे. तर, पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे यांचे पुत्र ऋषिकेश तसेच पुतण्या सचिन यांना उमेदवारी मिळावी यासाठी आग्रही आहेत. मुंबईत आमदार सुनील प्रभू हे मुलाच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत. तर, खासदार संजय दिना पाटील हे मुलीला उमेदवारी मिळावी, यासाठी आग्रही आहेत. माजी आमदार रमेश कोपरगावकर हे पत्नीला उमेदवारी हवी, यासाठी प्रयत्न करत आहेत. पक्षाचे नेते विनोद घोसाळकर हे त्यांच्या दुसऱ्या सुनेला उमेदवारी मिळावी म्हणून आग्रही आहेत. तर, आमदार अजय चौधरी हे सुनेला उमेदवारी मिळावी म्हणून आग्रही आहेत. तसेच, माजी महापौर श्रद्धा जाधव या मुलाला उमेदवारी हवी यासाठी आग्रही आहेत. आमदार सचिन अहिर हे मुलीला उमेदवारी हवी म्हणून प्रयत्न करत आहेत. तर, माजी आमदार दगडू सकपाळ हे मुलीला उमेदवारी हवी म्हणून आग्रही आहेत.

इतर पक्ष

AIMIM चे नेते इम्तियाज जलील यांचा मुलगा बिलाल यांना पालिकेच्या निवडणुकीसाठी तिकीट मिळावे, यासाठी आग्रही असल्याचे समोर आले आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अण्णा बनसोडे हे त्यांचे पुत्र सिद्धार्थ बनसोडे यांच्या नावासाठी आग्रही आहेत.

Post a Comment

0 Comments