Header Ads

  • Breaking News

    3/ ताज्या बातम्या / slider-tag

    प्लास्टिकच्या पाइपला सिमेंटचा मुलामा?








     प्लास्टिकच्या पाइपला सिमेंटचा मुलामा?

    पाच फुटांच्या पाइपवर चार ठिकाणी ठिगळे; वारंवार गळतीमुळे नागरिकांत संताप

    लातूर | प्रतिनिधी

    लातूर शहरातील गिरवरलकर नगर परिसरात मुख्य पाणीपुरवठा पाइपलाइनला वारंवार गळती होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पाइपलाइन दुरुस्तीसाठी खोदकाम सुरू असताना आमच्या प्रतिनिधींनी पाहणी केली असता, अवघ्या पाच फुटांच्या प्लास्टिकच्या पाइपवर तब्बल चार ठिकाणी सिमेंट लावून गळती बुजविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे दिसून आले.

    याबाबत तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याशी संवाद साधला असता, गेल्या एका महिन्यात याच ठिकाणी पाच वेळा पाइपलाइनला गळती झाल्याची माहिती त्याने दिली. ही मुख्य जलवाहिनी असून येथूनच गिरवरलकर नगर परिसरात पाणीपुरवठा केला जात असल्याने प्रत्येक वेळी तात्पुरती दुरुस्ती करून गळती थांबविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही त्याने सांगितले.

    मात्र, प्लास्टिकच्या पाइपवरील गळती सिमेंट लावून कितपत प्रभावीपणे थांबवता येऊ शकते, हा प्रश्न उपस्थित होत आहे. तांत्रिकदृष्ट्या अशा प्रकारची दुरुस्ती किती योग्य आहे, तसेच सिमेंटचे ठिगळ प्लास्टिकच्या पाइपवर किती काळ टिकते, याबाबतही नागरिकांकडून शंका व्यक्त केली जात आहे.

    महानगरपालिकेचे कर्मचारी दर चार-पाच दिवसांनी याच ठिकाणी खोदकाम करून दुरुस्ती करत असल्याचे चित्र दिसत आहे. वारंवार तात्पुरत्या उपाययोजना करण्याऐवजी संबंधित पाइपलाइन कायमस्वरूपी बदलण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

    या प्रकाराची माहिती महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आहे का? कर्मचाऱ्यांनी हा प्रश्न त्यांच्या निदर्शनास आणून दिला आहे का? की वारंवार होणाऱ्या गळतीकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे, असा सवालही नागरिक उपस्थित करत आहेत.

    मुख्य जलवाहिनीवर अशा प्रकारच्या तात्पुरत्या दुरुस्तीमुळे भविष्यात मोठी गळती होऊन पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महानगरपालिकेने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन कायमस्वरूपी आणि तांत्रिकदृष्ट्या योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad