क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश देणार्‍या महाविद्यालयांवर कारवाई करा



 क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश देणार्‍या महाविद्यालयांवर कारवाई करा

 क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश देणार्‍या महाविद्यालयांवर कारवाई करा
लातूर ः इयत्ता ११वी व १२वी विज्ञान बोर्ड ग्रुपिंगसाठी ग्रामीण भागातील सामूहिक कॉपी करणार्‍या महाविद्यालयांवर व परीक्षा केंद्रांवर कारवाई करावी आणि क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश देणार्‍या महाविद्यालयांना निर्बंध घालावेत, अशी मागणी नवीन शैक्षणिक धोरण जनजागृती मंचच्यावतीने जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर व शिक्षण उपसंचालक डॉ. गणपतराव मोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
देशभरात लातूरने शिक्षण क्षेत्रात आपला एक आगळा वेगळा पॅटर्न निर्माण केला आहे. येथील शिक्षण संस्था व विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमातून हे यश मिळाले आहे. मात्र, मागील काही वर्षांपासून ११वी व १२वी विज्ञान शाखेसाठी लागणारी ग्रुपिंग मिळवून देऊ, असे आमिष दाखवून ग्रामीण भागातील काही महाविद्यालये विद्यार्थी व पालकांची दिशाभूल करीत आहेत. यामुळे प्रवेशासाठी शहरातील अनेक विद्यार्थी ग्रामीण भागात जात आहेत. ही बाब ‘लातूर पॅटर्न’साठी धोकादायक आहे. परीक्षेच्या बाबतीत सवलती देऊन मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना सामूहिक कॉपी करून उत्तीर्ण केले जात आहे. यामुळे शहरी भागातील गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. यातून पालकांचीही आर्थिक पिळवणूक होत आहे. त्यामुळे सामूहिक कॉपी करणार्‍या महाविद्यालयांवर लक्ष ठेवून तसेच चुकीचा प्रकार परीक्षा केंद्रांवर होणार नाही याची दक्षता घ्यावी. सामूहिक कॉपी करण्यात येणार्‍या महाविद्यालयांची मान्यता रद्द करावी, महाविद्यालयाच्या संच मान्यतेपेक्षा अधिक प्रवेश देऊ नये. विभागीय शिक्षण मंडळ व शिक्षण उपसंचालक यांच्या मार्गदर्शनाखाली एक समिती स्थापन करून याची चौकशी करावी, अशी मागणी नवीन शैक्षणिक धोरण जनजागृती मंचच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनावर कालिदास माने, प्राचार्य डी. एन. केंद्रे, पांडुरंग देडे, प्राचार्य प्रशांत घार, प्रा. एकनाथ पाटील, प्रा. एस. टी. बिरादार, प्राचार्य जी. एन. शिंदे, प्राचार्य मारुती सूर्यवंशी, प्राचार्य संजय गवई, प्राचार्य सतीश मारकोळे, उपप्राचार्य दादासाहेब सरवदे, संतोष ढोरमारे, प्रा. ओंकार होनराव, एस. एन. वाडीकर, व्ही. एस. स्वामी आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Post a Comment

0 Comments